नाशिक : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी भेटण्याचं आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते मातोश्रीवरही भेटायला आले तरी चालेल, असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि सुहास कांदे यांची आज मनमाडला भेट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत. त्यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते. दुपारी ते मनमाड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात ते सुहास कांदे यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन खात्यावर केलेल्या आरोपांवरही ते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांकडून सुहास कांदे यांचा निषेध केला जात आहे.
सुहास कांदे यांनी तुमच्या भेटीची वेळ मागितली आहे. तुम्ही त्यांना वेळ देणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर, चालेल. निश्चित भेटू. त्यांनी मातोश्रीवर यावं. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलो. आता आपण मंदिरात आहोत. त्यामुळे इथे राजकारण नको, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सुहास कांदे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना शिवसेनेवर आरोपांची खैरात केली. तसेच आदित्य ठाकरे यांच्या खात्यावरही आरोप केला. पर्यटन खात्याने मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी दिला नाही. बाजूच्या मतदारसंघात निधी दिला. पण मला निधी दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी दिला नाही. तुम्ही पर्यटन खात्यातील एक जरी प्रकल्प माझ्या मतदारसंघात दाखवला तर मी तात्काळ राजीनामा देईन, असं आव्हानच सुहास कांदे यांनी आदित्य यांना दिलं.
एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली होती. त्यानंतरही त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नाही. वर्षावरून शंभुराज देसाई यांना फोन आला. त्यांनी शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असं सांगितलं. असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.