होय ! दोन विश्वासघात झाले, पण पहिला आपल्याच माणसांनी ? देवेंद्र फडणवीस यांचा थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप
माझ्यासोबत दोन वेळा विश्वासघात झाला. दुसरा विश्वासघात काही झाला त्याला मी दोष देत नाही. पण, पहिला विश्वासघात हा आपल्याच माणसांनी केला. तो उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळेच मी बदल घेतला.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. त्यानंतर त्यांनी अनेकदा बदला घेतला असे विधान जाहीरपणे केले. माझ्यासोबत दोन वेळा विश्वासघात झाला. दुसरा विश्वासघात काही झाला त्याला मी दोष देत नाही. पण, पहिला विश्वासघात हा आपल्याच माणसांनी केला. तो उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळेच मी बदल घेतला असे म्हणालो असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्पष्ट केले. दादर येथील वीर सावरकर स्मारकात ‘टीव्ही 9 मराठी’ने महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
संपादक उमेश कुमावत यांनी ‘आपण सरकार स्थापन केल्यानंतर बदला घेतला असे विधान वेदना केले होते, नेमके असे काय झाले होते ? असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत निवडणूक लढविल्या. प्रत्येक भाषणात ते मुख्यमंत्री, नेता म्हणून माझा उल्लेख करत होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी आमच्या चर्चा झाली तेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी झाली. पण, तेव्हा आम्ही नकार दिला होता. त्यानंतर आत नाही, बाहेर नाही, बंद दाराआड नाही, त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय कुठेच झाला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी पालघरची जागा आम्हाला द्या आम्ही कॉम्प्रमाइज करतो असा निरोप आला. त्यानंतर आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाला कट साईज बनवायचे होते
दरम्यानच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे सुरु होते. भाजपच्या विरोधात जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथे शिवसेनेने त्यांना मदत केली. तर, शिवसेनेच्या विरोधात जिथे कॉंग्रेस लढत होती तिथे राष्ट्रवादीने त्यांना मदत केली. यामागे शिवसेनेचे नंबर वाढले तर भाजपवर दबाब आणा आणि आमची संख्या वाढली तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबाब आणू असे हे साटेलोटे होते.
सुभाष देसाई माझ्यासोबत बसले होते. शिवसेना उमेदवारांसमोर उभ्या असलेल्या आमच्या बंडखोरांना फॉर्म परत घेण्याचे मी फोन करून आवाहन करत होतो. आमच्या ९५ टक्के बंडखोरांनी फॉर्म मागे घेतले. आमच्यासमोर नाटक केले. पण, भाजप उमेदवारांसमोर असलेल्या शिवसेनेच्या एकही बंडखोरांने आपले अर्ज मागे घेतले नाहीत. आमच्या डोक्यात असे काहीच नव्हते.
नंबर गेम फसला
निवडणुकीनंतर शिवसेनेचे नंबर वाढले आणि आपल्याला मुख्यमंत्री होता येईल असे उद्धव ठाकरे यांना वाटले तेव्हा त्यांनी माझा फोनही घेतला नाही. चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे त्यांनी केलेला विश्वासघात हा खूप मोठा आहे.
दुसरा विश्वासघात
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची चर्चा पुढे गेली. त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे. आपण सरकार तयार करु. राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या.
अजितदादा आमच्याकडे आले. त्यांनी जी शपथ घेतली ती प्रामाणिकपणे घेतली होती. नंतर काय ठरले कसे ते तोंडघशी पडले हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पण, पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता. तर दुसरा छोटा होता.
या दोन विश्वासघातानंतर ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली त्यावेळी त्यांचे सरकार पाडले. त्यांचे आमदार बाहेर पडले. आम्ही मोका घेतला आणि सरकार स्थापन केले. जे त्यांनी केले ते आम्ही त्यांना सव्याज परत दिले. या सर्वाना उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत असे फडणवी यांनी स्पष्ट केले.