काल गडकरी म्हणाले, मी जबरदस्तीने दिल्लीत, आज उद्धव म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं (Nagpur flyover) भूमीपूजन आज पार पडलं.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं (Nagpur flyover) भूमीपूजन आज पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या समारंभाला व्हिडीओ लिंकद्वारे हजेरी लावली. कडबी चौक ते गोळीबार चौक 4.82 किमीचा नवीन उड्डाणपूल असून, यासाठी 146 कोटी रुपये खर्च आला.
या उद्घाटन समारंभावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं. त्यांच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले, आज मला युतीच्या सरकारमध्ये झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची आठवण येते. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीत हा हायवे उभारण्यात आला. नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो. आता आपण समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकर सुरु करतोय”.
गडकरीसाहेब आपली मदत लागणार आहे
गडकरीसाहेब राज्याला आपली मदत लागणार आहे. रस्ते खचतायत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गडकरींकडच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज आहे. भविष्यात पर्यावरणाचं हित सांभाळात काम करायचं आहे. कितीही पाऊस पडला तरीही बाधा येणार नाही, असं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
आपत्ती निवारताना आता मोठा खर्च येतोय, त्यामुळे आता जे काही करायचे ते मजबूत करायचं आहे. सहकार्याचा रस्ता नॅरोगेज न राहता ब्रॅाडगेज असावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
VIDEO : उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
नितीन गडकरी काय म्हणाले होते?
नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी 29 जुलैला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यातील नव्या केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी गडकरींनी अनेक किस्से सांगितले होते. त्यावेळी आपण दिल्लीच्या राजकारणात कसे आलो हेही गडकरींनी सांगितलं.
गडकरी म्हणाले, “मी दिल्लीत अपघाताने आलो. मी दिल्लीत येण्यासाठी तयार नव्हतो. पण जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी साहित्य, मराठी इतिहास हा एकदमच वेगळा आहे. महाराष्ट्र देशातच आहे. मराठी सारस्वताचा, महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र सगळ्या बाबतीत पुढे आहे. महाराष्ट्र अजून समृद्ध, शक्तीशाली व्हावा, असं आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला भारत सरकारमध्ये काम करत असताना मिळते. त्या संधीचा उपयोग करावी”
नितीन गडकरी यांचं संपूर्ण भाषण
संबंधित बातम्या
मोदींच्या सूचनेनंतर गडकरींनी घेतली शरद पवारांची भेट; गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण