Yogendra Yadav Analysis : महाराष्ट्रात महायुती की, मविआ? कोण सरस? योगेंद्र यादव यांचे आकडे काय सांगतात?
Yogendra Yadav Analysis : प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्राबद्दल आपला अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात महायुती बाजी मारणार की, महाविकास आघाडी या बद्दल विविध मतमतांतर आहेत. प्रशांत किशोर यांच्या विश्लेषणाची एक बाजू आहे, तसच योगेंद्र यादव यांचं सुद्धा एक मत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखणं हा विरोधी पक्षांचा उद्देश होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष इंडिया आघाडीची मोट बनवून एकत्र आले. यात अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष आहेत. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा क्लीन स्वीप करण्यापासून रोखणं हा उद्देश आहे. भाजपाने निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे. इंडिया आघाडीने आम्हीच सरकार बनवणार असा दावा सुरु केला आहे. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर स्थिती बदलत गेलीय. भाजपाला 400 पार शक्य नाहीय, असं अनेक निवडणूक विश्लेषकांच मत आहे. काही निवडणूक तज्ज्ञांच्या मते भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, तर काहींच्या मते भाजपा सरकार बनवेल, पण त्यांना इतरांची गरज लागेल असं बोलल जातय. त्यामुळे निकालाआधी प्रचंड उत्सुक्ता ताणली गेलीय. यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे सत्ताधाऱ्यांविरोधात प्रबळ मुद्दा दिसला नाही. मोदी लाट दिसली नाही, तसच मोदी विरोधी लाटही दिसली नाही. त्यामुळे निकाल काय असतील याबद्दल एक कुतूहल आहे.
प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी प्रशांत किशोर यांच्या बिलकुल उलट मत व्यक्त केलं. प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपाला 300 जागा मिळतील, तर योगेंद्र यादव यांचं मत असं आहे की, भाजपाला एकट्याला 260 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. 300 पार करणही त्यांना अशक्य आहे. भाजपा 275 किंवा 250 च्या खाली येईल असा त्यांचा अंदाज आहे. भाजपाला तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी घटक पक्षांची मदत घ्यावी लागेल असा योगेंद्र यादव यांचं भाकीत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
मविआला अनुकूल स्थिती का?
वेगवेगळ्या राज्यात भाजपाला किती जागांचा फायदा, तोटा होईल या बद्दल त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. महाराष्ट्राचा निकाला काय असेल याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. मागच्या दोन टर्मच्या तुलनेत यंदा मविआला स्थिती अनुकूल दिसत होती. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूती दिसून आली. योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्राबद्दलही आपला अंदाज वर्तवला आहे.
महायुतीला किती जागांवर नुकसान?
महाराष्ट्रात भाजपा आणि त्यांच्या घटक पक्षांना म्हणजे शिंदे गट, अजित पवार गटाला 5 ते 15 जागांच नुकसान होऊ शकतं. 2019 मध्ये महायुतीने 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे यावेळी त्यांचा आकडा 25 ते 27 पर्यंत येऊ शकतो. याचा अर्थ मविआला 20 ते 22 जागा मिळू शकतात.