आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे काय?; अजित पवार यांचा शरद पवार यांना जळजळीत सवाल
समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. ही 1986ची गोष्ट. का झाली माहीत नाही? दोन वर्ष नेत्यांना पद दिलं नाही. राजीव गांधी यांनी नंतर मुख्यमंत्रीपद दिलं. 1990 निवडणुका झाल्या. बहुमत मिळालं नाही.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच थेट आणि जळजळीत टीका केली. पक्षाच्या नेतृत्वावरूनच अजित पवार यांनी शरद पवार यांना घेरलं. आता 83 वर्ष झालं आहे. आता तुम्ही थांबा. आराम करा. आता तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. तसेच तुम्ही राजीनामा दिला होता तर मागे घेतलाच कशाला? असा सवालही अजितदादांनी शरद पवार यांना केला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा आज मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणाची पिसेच काढली. तसेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडत नसल्याने त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाही चढवला. सर्वच क्षेत्रात निवृत्तीचं वय ठरलं आहे. सर्वच लोक निवृत्त होत असतात. पण तुम्ही अजूनही निवृत्त होण्याचं नाव घेत नाही. तुम्ही आता निवृत्त व्हा. आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. काही चुकलं तर आमचे कान पकडा. आम्ही दुरुस्त करू ना? पण तुम्ही अध्यक्षपदी अजूनही आहात. का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं?आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा जळजळीत सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
अजितदादा काय म्हणाले…
ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. घडलो आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. साहेब श्रद्धास्थान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. एखादा पक्ष कशासाठी स्थापन करत असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी. संविधानाचा आदर करण्यासाठी. सर्व समाजाच्या विकासासाठी आपण काम करत असतो. सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं असतं त्यासाठी आपण काम करत असतो.
1962मध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यांनी कामला सुरू केली. 1967ला उमेदवारी मिळाली. 1972 राज्य मंत्री झाले. 1975ला कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर असाच प्रसंग उद्भवला. आपल्या वरिष्ठ नेत्याने वसंतदादांचं सरकार बाजूला करून मुख्यमंत्री झाले. ते 38 वर्षाचे होते. तेव्हापासून राज्यातील जनतेने त्यांना साथ दिली. त्यानंतर पुलोद आलं. त्यात हशू आडवाणी वगैरे होते. 1980ला सरकार गेलं. तेव्हाही इंदिराजी म्हणाल्या, तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर तुमचं सरकार कायम ठेवते. पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं. 1980ला निवडणुका झाली. इंदिराजींची लाट आली. त्या पंतप्रधान झाल्या.
इतिहास बघितला तर देशाला करिश्मा असलेलं नेतृत्व लागतं. एकदा जनता पक्षात जयप्रकाश नारायण यांचं ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून आला. 1977ला देशपातळीवर निवडून आलेला जनता पक्ष कुठे आहे शोधावं लागतय. कारण करिष्मा असलेला नेता नव्हता.
समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. ही 1986ची गोष्ट. का झाली माहीत नाही? दोन वर्ष नेत्यांना पद दिलं नाही. राजीव गांधी यांनी नंतर मुख्यमंत्रीपद दिलं. 1990 निवडणुका झाल्या. बहुमत मिळालं नाही. अपक्षांनी साथ दिली. त्यानंतर राजीव गांधी आपल्यातून निघून गेले,. त्यानंतर लाट आली. नरसिंहराव पंतप्रधान झाले., त्यानंतर नरसिंहराव यांनी केंद्रात बोलावलं. साहेब केंद्रात गेले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यानंतर साहेबांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं.