शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसणार, YSR काँग्रेसला लोकसभेचं उपाध्यक्षपद?
एनडीएमधील भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र पुन्हा एकदा दुय्यमत्वाचीच वागणूक मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : केंद्रात अवजड उद्योग मंत्रालायसारखं काहीसं कमी महत्त्वाचं मंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. त्यानंतर खासदारांची संख्या पाहता लोकसभेचं उपाध्यक्ष पद तरी दिले जाईल, अशा आशेत असणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसली जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
वायएसआर काँग्रेसची लोकसभा-विधानसभेतील कामगिरी
वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीत स्वबळावर 25 पैकी 22 जागांवर विजय मिळवला आहे. केवळ तीन जागांवर माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीने जिंकल्या. तर भाजपला आंध्र प्रदेशात खातंही उघडता आलं नाही. वायसएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीतही मोठी मुंसडी मारली. 175 पैकी 151 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर वायएस जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलेल्या वायएसआर काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांचे महत्त्व वाढले आहे. केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही त्यांना विशेष महत्त्व आले आहे.
वायएस जगनमोहन रेड्डींना एनडीएत घेण्याचे प्रयत्न?
वायएस जगनमोहन रेड्डी यांच्यासारखा यशस्वी नेता आपल्यासोबत असावा, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकसभेचं उपाध्यक्षपद वायएसआर काँग्रेसला देऊन, जगनमोहन रेड्डी यांना एनडीएमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं.
शिवसेनेच्या तोंडाल पुन्हा एकदा पानं पुसणार?
दुसरीकडे, एनडीएमधील भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र पुन्हा एकदा दुय्यमत्वाचीच वागणूक मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण सद्यस्थितीत एनडीएमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खासदार असलेल्या शिवसेनेने लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा केला होता. शिवसेनेच्या सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभेचं उपाध्यक्षपद दिले जाणार होते. मात्र, आता भाजपने शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसण्याची तयारी केली असून, हे पद वायएसआर काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. आधीच गेली चार वर्षे सरकारमध्ये राहून न राहिल्यासारखं करणाऱ्या शिवसेनेची नाराजी दूर करुन लोकसभेत सोबत घेण्यास भाजप यशस्वी ठरली खरी, मात्र आता लोकसभा उपाध्यक्षपदावरुन पुन्हा एकदा शिवसेना नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.