मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खंद्या कार्यकर्त्याने कोक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. युवा सेनेचे कोक्षाध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवत राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र लिहित आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमेय घोले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आदित्य ठाकरे यांना पाठवलेलं पत्र शेअर केलं आहे. आपण जड अंत:करणाने हा निर्णय घेत असल्याचं अमेय म्हणाले आहेत. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून आपण तसा निर्णय घेतल्याची तक्रार त्यांनी पत्रात केली आहे.
“मी राजकारणात तुमच्यामुळे आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेली 13 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. पण वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला काम करताना खूप त्रास आणि मनस्ताप झाला”, असं अमेय घोले म्हणाले.
“याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे आणि मला सुरळीतपणे माझे कार्य सुरु ठेवता यावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. पण काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंत:करणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. सांगण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या – कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे”, अशा शब्दांत अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र पाठवत राजीनामा दिलाय.
जय महाराष्ट्र !!! @AUThackeray ? pic.twitter.com/tYl9gk1P5J
— Amey Ghole (@AmeyGhole) April 17, 2023
“आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरता नाही. तुमच्याबरोबर संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो”, अशी आशा त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली. अमेल घोले यांच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे त्यांची मनधरणी करतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच अमेय घोले यांच्या निर्णयावर आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र पाठवत राजीनामा दिला असला तरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जातोय. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अमेय घोले यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडी कुठपर्यंत जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.