हीच वेळ, हीच संधी, महाराष्ट्र वाट पाहतोय, आदित्य ठाकरेंसाठी मोर्चेबांधणी सुरु
आता आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार का, आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यास पुढे राज्याचं नेतृत्त्व म्हणजेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी गळ घातली जात आहे. “हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट पाहतोय” असा आशय आणि त्यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो, असे पोस्टर सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. विशेष म्हणजे, हे पोस्टर शेअर करणारे दुसरे-तिसरे कुणी नसून, युवासेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा उद्या (13 जून) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करु नये. त्याऐवजी दुष्काळग्रस्त भागासाठी मदत करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी समर्थकांना केले आहे. त्यामुळे आता युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरुन पोस्टर शेअर केले जात आहेत.
युवासेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे पोस्टर शेअर करत आहेत, ते अत्यंत सूचक आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच चर्चा सुरु झाली आहे की, आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यांच्यासाठी मुंबईतील दोन सुरक्षित मतदारसंघ सुद्धा शोधले जात आहेत. याचदरम्यान आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना पोस्टरच्या माध्यमातून निवडणूक लढून, राज्याचं नेतृत्त्व करण्याची अप्रत्यक्ष विनंती केली आहे.
हीच वेळ आहे, हीच संधी आहे !!! महाराष्ट्र वाट पाहतोय !!! pic.twitter.com/RkqIfFFKhn
— Amey Ghole (@AmeyGhole) June 12, 2019
युवासेनेचे कोषाध्यक्ष असलेल्या अमेय घोले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, “हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट पाहतोय”
विशेष म्हणजे, अमेय घोले हे केवळ युवासेनेचे कोषाध्यक्ष नाहीत, तर ते मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत. तसेच, मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे ते सदस्यही आहेत. त्यामुळे अमेय घोले यांच्या पोस्टरची सध्या सोशल मीडियासह महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे. याआधी युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरेदसाई यांनीही इन्स्टाग्रामवर आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करुन, सूचक वक्तव्य केले होते.
दरम्यान, आता आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार का, आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यास पुढे राज्याचं नेतृत्त्व म्हणजेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, आदित्य ठाकरे यांनी जर विधानसभा निवडणूक लढवली, तर ‘ठाकरे’ कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरतील, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. कारण, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांपैकी कुणीही आजवर कुठलीही निवडणूक लढली नाही. या सगळ्यांनीच संसदीय राजकारणाच्या बाहेर राहून, आपला पक्ष चालवत राहिले आणि एकूणच राजकीय दिशा आखत राहिले.