आता लक्ष्य विधानसभा, पवार मैदानात, भोसरीपासून सुरुवात
महेश लांडगे हे भोसरीमधून आमदार आहेत, ते भाजपचे समर्थक आहेत. तर शिरुर लोकसभा निवडणुकीत यंदा राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली.
भोसरी (पुणे) : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं लक्ष आता विधानसभेकडे वळवलं आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार हे स्वत: रणांगणात उतरले आहेत. दुष्काळ दौरा केल्यानंतर शरद पवारांनी पक्षाच्या संघटना बांधणी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरीत आज राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतं.
महेश लांडगे हे भोसरीमधून आमदार आहेत, ते भाजपचे समर्थक आहेत. तर शिरुर लोकसभा निवडणुकीत यंदा राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली.
भोसरी येथे शरद पवार आज एकूण तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 ते 12 या वेळेत पवार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
लोकसभा निवडणुकीत मोठं अपयश
लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला मागे सारलं असलं तरी शिवसेना-भाजप या पक्षांच्या तुलनेत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. 48 पैकी केवळ 4 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. यात रायगड, सातारा, बारामती आणि शिरुर या जागांचा समावेश आहे. तसेच, अमरावीतून राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा जिंकल्या.
लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर राष्ट्रवादीने तातडीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकांशी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, तर त्यानंतर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.