Budh Gochar 2023 : कर्क राशीत बुध ग्रहामुळे होणार उलथापालथ, या राशींना मिळणार अपेक्षित फळ
ग्रहांमध्ये राजकुमार म्हणून ख्याती असलेला बुध ग्रह चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या स्थितीमुळे चार राशीच्या जातकांना अपेक्षित फळ मिळणार आहे.
मुंबई : गोचर कुंडलीत ग्रह त्या त्या स्थितीवरून राशींना फळ देत असतो. बुधाची स्थिती काही राशींना अशीच फलदायी ठरणार आहे. कारण बुध कर्क राशीतून चार राशीच्या जातकांना पाठबळ देणार आहे. बुध ग्रह 8 जुलै 2023 रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी कर्क राशीत प्रस्थान करेल. बुध ग्रह मिथुन आणि कन्या राशीवर स्वामित्व गाजवतो. तर शुक्र आणि शनि या ग्रहांसोबत मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे निश्चितच या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. बुध ग्रह बुद्धिकारक ग्रह असून शुभ ग्रहाचा दर्जा आहे. या गोचरामुळे काही राशींना करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
या राशीच्या जातकांना मिळेल लाभ
वृषभ : या राशीच्या जातकांना बुध ग्रहाची चांगली साथ मिळणार आहे. बुध ग्रहाच्या स्थितीमुळे बौद्धिक कामात चांगलं यश मिळेल. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगला लाभ मिळेल. तसेच पदोन्नतीचे नवे मार्ग समोर दिसतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांची साथ मिळेल. केलेल्या कामाचा चांगला मोबदला या काळात मिळेल.
कन्या : या राशीच्या जातकांना करिअरमध्ये नवी शिखरं गाठता येणार आहेत. या काळात नावलौकिक मिळेल. समाजात मानसन्मान मिळाल्याने आनंद गगनात मावेनासा होईल. या काळात मिळालेल्या संधीचं सोनं करता येईल. आपल्या इच्छांची पूर्तता करता येणार आहे.
तूळ : या राशीच्या लोकांनाही सकारात्मक बदल दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी किचकट कामंही सोपी कराल. त्यामुळे वरिष्ठांची तुमच्या कृपा राहील. विदेशात जाण्याची संधीही या काळात मिळेल. व्यवसायातही पडता काळ अनुभवल्यानंतर नवी पालवी फुटल्याचं दिसून येईल. काही करार हाती आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल.
मकर : या राशीच्या जातकांनाही बुधाची उत्तम साथ मिळेल. भागीदारीच्या धंद्यात चांगला परतावा मिळेल. भागीदार नाराज होईल असं वागू नका. त्याला अपेक्षित असलेली मदत करा. जोडीदार तुमच्या कामाने प्रभावित होईल. प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे धोबीपछाड कराल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)