Grahan 2023 : चंद्र आणि सूर्य दोघंही येणार राहुच्या विळख्यात, ग्रहणाद्वारे राहु-केतु घेतात सूड! जाणून घ्या यामागची गोष्ट
2023 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण जगातील काही भागातून दिसणार आहे. ग्रहणासाठी राहु आणि केतुला जबाबदार मानलं जातं. काय आहे यामागचं कारण जाणून घेऊयात.
मुंबई – 20 एप्रिल 2023 रोजी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. ही जरी खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला खूप महत्त्व आहे. धार्मिक दृष्टीने सूर्य आणि चंद्र ग्रहण खूप महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. सूर्य ग्रहण मेष राशीत होणार आहे. विशेष म्हणजे सूर्य ग्रहण असलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्य मेष राशीत असल्याने डबल ग्रहण योग जुळून येणार आहे. 14 एप्रिल रोजी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर 19 एप्रिल 2023 रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल.
त्यामुळे सूर्य राहुच्या संपर्कात एका महिन्यासाठी, तर चंद्र राहुच्या संपर्कात सव्वा दोन दिवसांसाठी येणार आहे. चंद्र 22 एप्रिल 2023 रोजी मेष राशीतून वृषभ राशीत सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी प्रवेश करेल. राहु ग्रह मेष राशीत 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. चला जाणून घेऊयात ग्रहणाचा राहु-केतुशी काय संबंध आहे.
ग्रहणाची कथा
पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले होते. त्यात अमृत कलशपण होता. अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि असुरांमध्ये वाद सुरु झाला. वाद सोडवण्यासाठी भगवान विष्णुने मोहिनी रुप धारण करून देव आणि असुरांना अमृतपान करण्याचं ठरवलं.
जेव्हा अमृताचं वाटप होत होतं तेव्हा स्वरभानु नावाचा असुर अमृत पिण्यासाठी आसुसलेला होता. तेव्हा त्याने रुप बदलून सूर्यदेव आणि चंद्रदेवांच्या मधोमध येऊन बसला. तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं आणि भगवान विष्णुंना सांगितलं.
विष्णुंना ही माहिती कळताच त्यांनी सुदर्शन चक्राने स्वरभानुचं शीर धडापासून वेगळं केलं. पण काही अमृताचे थेंब त्याच्या गळ्यात उतरले होते. त्यामुळे दोन्ही भागांना अमरत्व मिळालं होतं. डोक्याचा भागाला राहु आणि धडाला केतु म्हणून ओळख मिळाली.
सूर्य आणि चंद्राने पितळ उघड पाडल्याने राहु-केतु यांचा राग आहे. त्यामुळे चंद्र आणि सूर्य ग्रहण होतं, अशी पौराणिक कथा आहे. ग्रहणात राहु आणि केतुचा प्रभाव सर्वाधिक असतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)