Varuthini Ekadashi 2022 : वरुथिनी एकादशीचे महत्व काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
वरुथिनी एकादशीला विष्णूची पूजा, आराधना केल्यानं, तसंच उपवासामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि 10 वर्षाच्या तपश्चर्येइतके फळ प्राप्त होते, अशी धारणा आहे. अशावेळी वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व जाणून घेऊया
मुंबई : हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे. वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) ही विष्णूला समर्पित मानली जाते. या वर्षी वरुथिनी एकादशी 26 एप्रिल 2022 म्हणजे आज आहे. मंगळवारी एकादशी असल्याने आज हनुमान (Hanuman) आणि मंगळाची पूजा करण्याचा विशेष योग आहे. एकादशीला विष्णूची पूजा (Worship of Vishnu), आराधना केल्यानं, तसंच उपवासामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि 10 वर्षाच्या तपश्चर्येइतके फळ प्राप्त होते, अशी धारणा आहे. अशावेळी वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व जाणून घेऊया
वरुथिनी एकादशी शूभ मुहूर्त
या दिवशी संध्याकाळी 07.06 पर्यंत ब्रह्मयोग आहे, त्यानंतर इंद्र योग सुरू होईल. शतभिषा नक्षत्र दुपारी 04:56 पर्यंत आहे, त्यानंतर पूर्व भाद्रपद होईल. हे दोन्ही योग आणि नक्षत्र शुभ कार्यासाठी शुभ आहेत. वरुथिनी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून भगवान विष्णूची पूजा करू शकता. त्रिपुष्कर योग वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी 12:47 उशिरा ते दुसऱ्या दिवशी 27 एप्रिल रोजी पहाटे 05:44 पर्यंत आहे. या दिवसाचा अभिजित मुहूर्त सकाळी 11.53 ते दुपारी 12.45 पर्यंत आहे.
वरुथिनी एकादशीचा पूजा विधी
या दिवशी सकाळी उठून सर्वात आधी स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. मंदिरात दिवा लावावा. मंदिरात देवतांना स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र नेसवावेत. व्रत करता येत असेल तर व्रत करावे. भगवान विष्णूचे ध्यान करावं. विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात अशीही धारणा आहे. भगवान विष्णूला नैवेद्य दाखवावा. विष्णूच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा. देवाला फक्त सात्विक पदार्थ, गोष्टी अर्पण केल्या जातात हे आवर्जुन लक्षात ठेवा.
वरुथिनी एकादशीबाबतच्या अख्यायिका
वरुथिती एकादशीबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. एका पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शंकराने क्रोधित झालेल्या ब्रम्हाजींचे पाचवे डोके कापले. तेव्हा त्यांना शाप मिळाला होता. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी शंकराने वरुथिनी एकादशीचे व्रत केले. त्यामुळे भगवान शंकर शाप आणि पापापासून मुक्त झाले. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्यानं अनेक वर्षाच्या तपश्चर्येचे फळ मिळते.
अजून अशीही एक अख्यायिका सांगितली जाते की प्राचिन काळी नर्मदा नदीच्या काठी मंधाता नावाचा राजा राज्य करत होता. एकदा ते जंगलात तपश्चर्या करत असताना एक अस्वल तिथे आलं आणि राजाचा पायाला चावू लागलं. राजा मंधाताला प्रचंड वेदना होत होत्या. मात्र, तशा स्थितीतही त्याने आपली तपश्चर्या सुरुच ठेवली. अस्वलाने राजाला जंगलात ओढून नेण्यास सुरुवात केली. तेव्हा राजा मनात भगवान विष्णूकडे रक्षणासाठी प्रार्थना केली. विष्णू प्रकट झाले आणि अस्वलाला मारुन राजाचे प्राण वाचवले. तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता. हे पाहून भगवान विष्णूने राजाला मथुरेला जाऊन वरुथिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितलं. या व्रताच्या प्रभावाने तुम्ही बरे व्हाल, असंही ते म्हणाले. तेव्हा राजाने विष्णूंनी जे सांगितलं तेच केलं. त्यामुळे राजाचा पाय त्याला परत मिळाला. मृत्यूसमयी राजाने वरुथिनी एकादशीचे व्रत करुन स्वर्गप्राप्ती मिळवली.
इतर बातम्या :