Gautam Adani: अदानी शेअर्सची मोठी झेप, एका दिवसात इतक्या कोटींनी वाढली गौतम अदानी यांची संपत्ती
उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्ती एका दिवसात मोठी भर पडली आहे. गौतमी अदानी यांच्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला ठरला. अदानी समुहाचे शेअर्स चांगले वधारले आहेत.
मुंबई : गुरुवारी शेअर मार्केटमध्ये अनेक सकारात्मक घडामोडी दिसल्या. पण सर्वात जास्त फायदा झाला तो अदानी समूहाचा. कारण अदानी समुहाच्या ( Adani Group ) शेअर्समध्ये तेजी आली. चार कंपन्यांचे समभाग वरच्या सर्किटमध्ये बंद झाले. समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती यामुळे $1.86 अब्जने वाढून 15,221 कोटींवर पोहोचली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी ( Gautam Adani ) यांची एकूण संपत्ती आता $56.1 बिलियन झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते 23 व्या क्रमांकावर आहेत. 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाचा अहवाल प्रसिद्ध केला. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये महिनाभरापेक्षा जास्त काळ घसरण झाली होती.
अदानी समुहात मोठी गुंतवणूक
GQG पार्टनर्सचे राजीव जैन, ज्यांनी अदानी ग्रुपमध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ते म्हणतात की, ग्रुपचे शेअर्स पुढील पाच वर्षांत मल्टीबॅगर होऊ शकतात. यासोबतच अदानी समूहाने गुंतवणूकदार आणि कर्जदारांचा विश्वास जिंकण्यासाठी सर्वसमावेशक योजना आखली आहे. या अंतर्गत, कमाई वाढवण्यावर आणि लिव्हरेज रेशो कमी करण्यावर ग्रुपचा भर आहे.
समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर 3.24 टक्क्यांनी वाढून 1,752.95 रुपयांवर बंद झाले. अदानी पोर्ट्स 0.83 टक्के आणि अदानी पॉवर 1.10 टक्क्यांनी वधारले. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटलच्या समभागांनी पाच टक्क्यांच्या वरच्या सर्किटला स्पर्श केला. अदानी विल्मर ३.३४ टक्क्यांनी, एनडीटीव्ही पाच टक्क्यांनी, सिमेंट कंपनी एसीसी १.३६ टक्क्यांनी आणि अंबुजा सिमेंट्स ०.९२ टक्क्यांनी वाढले.
मुकेश अंबानी यांची संपत्तीही वाढली
गुरुवारी भारत आणि आशियातील सर्वात मोठे टायकून मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $641 दशलक्षने वाढली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमनची एकूण संपत्ती आता $81.1 अब्ज झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते 12 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षात त्यांची एकूण संपत्ती $6 अब्जांनी घसरली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
जगातील सर्वात मोठे अब्जाधीश असलेल्या फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत गुरुवारी ४.७१ अब्ज डॉलरची घट झाली आणि ती आता १९५ अब्ज डॉलरवर आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इलॉन मस्कच्या संपत्तीत $298 दशलक्षची घट झाली. त्यांची एकूण संपत्ती 171 अब्ज डॉलरवर आली आहे.