Akshay Tritiya 2023 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्व
या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात
मुंबई : साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणुन ज्या दिवसाचं महत्व विशद केलं जातं असा हा दिवस अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2023) सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळया नावाने साजरा होतो. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व आहे. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालुन थंड पाणी ब्राम्हणाला दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं अशी मान्यता आहे.
थंडगार पाण्यासमवेत, कैरीचं पन्हं, वाटली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातु, अश्या अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील करण्यात येतं. तसे पाहता या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणाऱ्या आहेत आणि अक्षयतृतीया हा दिवसच मुळी भर उन्हाळयात येणारा असल्याने या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ मिळावा हा देखील हेतू या सर्व पदार्थांमधुन अभिप्रेत होतो.
कधी आहे यंदाची अक्षय तृतीया
यावेळी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी येईल. याच दिवशी परशूराम जयंती आणि रमजान ईद देखील आहे. शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जे शुभ कार्य केले जाते. त्याचे अनंत फळ मिळते. या दिवशी पंचांग न पाहता शुभ कार्य करता येते. पुराणानुसार या दिवशी पितरांसाठी केलेले तर्पण आणि दान पुण्य देते. हा सण सोमवारी किंवा रोहिणी नक्षत्राच्या दिवशी आला तर त्याचे फळ वाढते.
हिंदु परंपरेप्रमाणे या दिवशी करावयाच्या गोष्टी
- अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.
- फळं, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच, याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी.
- ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे.
- या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे.
- वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी.
- या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे.
- पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन ब्राम्हणास दान द्यावी.
- पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हं, चिंचोणी, कुरडया, कैरीची डाळ ब्राम्हणास खावयास द्यावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)