शिवलींगावर चुकूनही वाहू नये या गोष्टी, भोलेनाथ होतात नाराज
शिवभक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपापल्या परीने पूजा करतात. भगवान शिवाची पूजा करणे खूप सोपे मानले जाते, मात्र त्यांच्या पूजेत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मुंबई : हिंदू धर्मात भगवान शिवाची विशेष पूजा (Shiv Puja) केली जाते. लवकर प्रसन्न होणार्या देवतांमध्ये भगवान शिव प्रथम येतात. त्यांना फक्त एक तांब्या पाणी अर्पण करूनही प्रसन्न केले जाऊ शकते. शास्त्रात सोमवार, प्रदोष, मासिक शिवरात्री, श्रावण महिना आणि महाशिवरात्री हे भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. शिवभक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपापल्या परीने पूजा करतात. भगवान शिवाची पूजा करणे खूप सोपे मानले जाते, मात्र त्यांच्या पूजेत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. भगवान शंकराच्या पूजेत काही साहित्यांचा वापर करणे अवश्य टाळावे. अन्यथा महादेवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करू नयेत.
शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत
भगवान विष्णू, भगवान हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण यांना तुळशीची पाने अतिशय प्रिय आहेत. तुळशीच्या पानांशिवाय नैवेद्य अपूर्ण मानला जातो, पण भोलेनाथांना कधीही तुळशीची पाने अर्पण करू नयेत. भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण केल्याने भगवान क्रोधित होतात. वास्तविक भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधर याचा वध केला होता, त्यामुळे तुळशीची पाने भगवान शंकराला अर्पण केली जात नाहीत.
शंखाने जलाभिषेक करू नये
भगवान शंकराचा जलाभिषेक कधीही शंखाने करू नये. भगवान शिवाने शंखचूडचा वध केला जो एक असुर होता आणि शंखचूड हा राक्षस होता म्हणूनच भगवान शिवाला जल अर्पण करताना शंखचा वापर करू नये. शंखाने जलाभिषेक केल्याने भगवान शिवाच्या उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही.
नारळ पाणी
भगवान शंकराच्या पूजेमध्ये नारळपाणी कधीही वापरू नये. संपूर्ण नारळ जरी भगवान शंकराला अर्पण करता येत असले तरी चुकूनही शिवलिंगाला नारळाचे पाणी अर्पण करू नये.
ही फुले वाहू नका
लाल रंगाची फुले, केतकी, चंपा आणि केवड्याची फुले भगवान शंकराला कधीही अर्पण करू नयेत. ही फुले अर्पण करणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. या उपासनेचे फळ तुम्हाला मिळत नाही.
शिवलिंगावर कुंकू अर्पण करण्यास मनाई आहे
भगवान शिवाला शेंदूर आणि कुंकू कधीही वाहू नये. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या मागणीसाठी शेंदूर लावतात, तर भगवान शिवाची विनाशकाच्या रूपातही पूजा केली जाते, अशा वेळी भगवान शिवाला कुंकू अर्पण केले जात. त्याएवजी माता पार्वतीला कुंकू वाहावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)