Biroba Yatra: कौठेवाडीतील बिरोबा देवाची यात्रा आणि अनोखी परंपरा
यात्रेच्या निमित्ताने सगेसोयरे, मित्र मंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते आणि सुख दुखःच्या गोष्टी होतात त्यामुळे अशा प्रकारच्या परंपरा भावी पिढीला आपल्या संस्कृतीची जाण करून देतात.
अहमदनगर: महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ (Religious Places) त्या भागातील परंपरेमुळे प्रसिद्ध आहेत. तिथील परंपरा त्याभागाचं वैशिष्ट्य,त्याठिकाणचे वैविध्य,धार्मिक स्थळं, दैवी स्थानांची प्रथा परंपरा. (Tradition) हे अनोखेच असतात. अहमदनगर जिल्हायतील अकोले तालुक्यातील कौठेवाडी या गावातील बिरोबाची यात्रा (Biroba Yatra) कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसपुर्तीसाठी पेटलेले लााल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे. मातीचे हे पेटते माठ घेऊन भक्त बिरोबाच्या मंदिराला फिरे मारत असतात. अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरते. यात्रेच्या वेळी हा थरारक अनुभव पाहायला मिळतो. आज देखील ही परंपरा जपली जातेय.
नेमकी काठ परंपरा काय ?
कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवला जातो. खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकड या घागरीत उभी भरतात. त्यात कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने नवीन को-या कपड्याने त्याला घट्ट बांधातात. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट आणि नवस केलेल्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले असते.कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि अख्यायिका आहेत. पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेवून आला होती, तेव्हा त्यांच्यावर आलेल संकट बिरोबाच्या नवसान दूर झाले आणि ते भयमुक्त झाले. तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठ्याची परंपरा सुरू आहे. जत्राच्या निमित्ताने सगेसोयरे, मित्र मंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते आणि सुख दुखःच्या गोष्टी होतात त्यामुळे अशा प्रकारच्या परंपरा भावी पिढीला आपल्या संस्कृतीची जाण करून देतात.
हजारो भाविक उत्साहात सहभागी
कामाच्या निमित्ताने राज्यभर विखुरलेले ग्रामस्थ आणि हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या यात्रेच्या या परंपरेला कोरोनामुळे खंड पडला होता आता मात्र महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाल्याने मोठा उत्साह यात्रेत बघायला मिळाला. बिरोबा महाराजांच्या मानाच्या काठीच्या मिरवणूकीत हजारो भक्त सहभागी झाले होते. विस्तवाचे निखारे अंगावर पडत असतानाही मंदिराला प्रदक्षिणा मारताना या भाविकांना बघण्यासाठी राज्यभरातून लोक गर्दी करतात. बिरोबा महाराजांच्या काठीच्या मिरवणूकीनंतर माठात सजवलेल्या या कठ्यांना आग लावली जाते आणि नवसपुर्ती करण्यासाठी पेटलेले हे माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारून भाविक आपली नवसपुर्ती करतात. ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून हे गाव जपत आलंय. अशाप्रकारे साज-या होणा-या यात्रा जत्राच्या निमित्ताने सगेसोयरे, मित्र मंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते
नवसाचा कठा श्रद्धा की अंधश्रद्धा –
यायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले आणि आग ओकाणारे धगधगणारे कठे (घागर) डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीगणिक किलो-किलो तेल या ढणढणत्या कठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळत. मात्र, लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पुर्तीसाठी कठा तयार केला जातो तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबा संचार झालेला असतो, अशी इथे येणाऱ्या भाविकांची धारणा आहे.
जिल्ह्यातील इतर श्रद्धा स्थानं आणि पर्यटन स्थळं
आदिवासी बहुल असलेल्या अकोले तालुक्यात अशाप्रकारे अनेक प्रथा परंपरा जपल्या जात आहेत. तालुक्यात टाहाकारी येथील जगदंबा मंदिर, कळसूबाई मंदिर, हरीश्चंद्र गड, अमृतेश्वर मंदिर, अगस्ति मंदिर अशी अनेक मंदिर असून ती भक्तांची श्रद्धास्थाने आहेत. रतनगड, रंधा धबधबा, निळवंडे आणी भंडारदरा धरण यासह असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्रटनाबरोबरच परंपरा जोपासण्याचे काम येथील आदिवासी बांधव करत आहेत.