अचानक घरी पाहुणे येणे, डोळ्यांत अश्रू येणे; पूजा करताना असं काही घडलं तर… प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलेत संकेत
पूजा करतेवेळी आपल्याला असे काही संकेत मिळत असतात पण त्याचा अंदाजा आपल्याला येत नाही. पण समजा पूजा करताना अशा काही घटना घडल्या तर त्यावेळी नेमके काय संकेत आपल्याला मिळतात याबाबत प्रेमानंद महाराजांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भगवंताची पूजा, भक्ती, श्रद्धा या गोष्टींना एक विशेष स्थान आहे. अध्यात्म हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. तसेच पूजा करतानाची प्रत्येकाची पद्धतही वेगवेळी असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की आपण जी पूजा करतो ती भगवंतापर्यंत पोहचते का? किंवा पूजा करतेवेळी भगवंत आपल्याला काही संकेत देतात का? या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. पण हे घडत जरी असेल तरी ते आपल्या लक्षात कसं येणार? याबद्दल सांगितलं आहे प्रेमानंद महाराज यांनी.
प्रेमानंद महाराजांनी पूजेदरम्यान मिळणाऱ्या संकेतांबद्दल काय सांगितलं?
प्रेमानंद महाराज यांनी पूजेदरम्यान मिळणाऱ्या काही खास संकेतांबद्दल सांगितलं आहे. आपली पूजा यशस्वी झाली आहे आणि देव आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे, हे कसे ओळखायचं याबद्दल प्रेमानंद महाराज यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर, पूजेवेळी घडणाऱ्या काही गोष्टी आणि त्यांचे संकेत काय असू शकतात ते पाहुयात.
दिव्याची ज्योत उंच होणे : तुम्ही पूजा करत असताना किंवा प्रार्थना म्हणत असताना दिव्याची ज्योत अचानक उंच होताना दिसत असेल तर, प्रेमानंद महाराज सांगतात की, पूजेदरम्यान दिव्याची ज्योत अचानक उंच होणे हा एक महत्त्वाचा संकेत मानला जातो. याचा अर्थ देवापर्यंत तुमची प्रार्थना पोहोचली असून तो तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. हा संकेत म्हणजे देव तुमच्यासोबत आहे आणि तुमची पूजा त्याने स्वीकारली आहे.
डोळ्यांतून अश्रू येणे : प्रेमानंद जी महाराज सांगतात की, जेव्हा तुम्ही अगदी मनापासून देवाशी जोडलेला असता, तेव्हा पूजेदरम्यान डोळ्यात अश्रू येऊ शकतात. हे अश्रू केवळ दु:ख किंवा वेदनांचे असतात असं नाही, तर ते एक प्रकारच्या आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक असतात. अशा परिस्थितीत भक्ताची इच्छा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण देवाला पूर्णपणे आपला विश्वास आणि श्रद्धा समर्पित करतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो.
देवांच्या फोटोवरील फुले खाली पडणे : तुम्ही पूजा करत असताना तुमच्या मनात कोणता तरी प्रश्न किंवा काहीतरी इच्छा आहे जी पूर्ण व्हावी अशी तुम्ही प्रार्थना करत असाल आणि तेव्हा तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडलं तर काय संकेत असतात. याबद्दल प्रेमानंद महाराजांनी सांगितलं आहे की, पूजा करताना देवांच्या फोटोवरील फुले अचानक खाली पडणे, हे एक शुभ चिन्ह आहे. देव तुमच्यासोबत आहे आणि तो तुमच्या भक्तीवर आनंदी आहे. हे तुमच्या आयुष्यात यश आणि समृद्धी येणार असल्याचे किंवा काही चांगली बातमी मिळू शकते, हे देखील दर्शवते.
पूजेदरम्यान अचानक घरी पाहुणे येणे : प्रेमानंद महाराज यांच्या मते, जेव्हा तुम्ही पूजा करत असता आणि त्याच वेळी अचानक कोणी पाहुणे तुमच्या घरी येतात तो एक शुभ संकेत असतो. ‘अतिथि देवो भव:’ या ओळीचा अर्थही हाच होतो की घरी आलेला प्रत्येक पाहुणा हा देवासमानच असतो. तेव्हा घरी अचानक आलेले पाहुणे , किंवा एखादी व्यक्ती ही देखील देवाच्या रुपातच आल्याचा एक संकेत असतो. ही घटना एक प्रतीक मानली जाते की, देव तुमच्या भक्तीवर आनंदी आहे आणि तुमच्या भावनांचा आदर करत आहे. पाहुण्यांचे आगमन हे एक शुभ चिन्ह आहे, जे दर्शवते की तुम्हाला तुमच्या भक्तीचे फळ लवकरच मिळेल.