राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. अनेक नेत्यांच्या घरी देखील गणपती विराजमान झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी देखील बाप्पाचं आगमन झालंय. राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत 'शिवतीर्थ' येथे हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्याकडून भाजपवर टीका केली जात आहे. राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम चांगलं व्हावं यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले की काय? अशी चर्चा रंगली होती. पण फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं नेहमीच कौतुक केलं जातं. राजकारणाच्या मैदानात नेते एकमेकांवर टीका-टीप्पणी करतात, पण वैयक्तिक पातळीवर त्यांच्याकडून चांगले संबंध जोपासले देखील जातात.
राज ठाकरे यांची याआधीदेखील अनेक भाजप नेत्यांनी भेट घेतली आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी याआधी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतलीय. स्वत: देवेंद्र फडणवीस हे सुद्धा याआधीदेखील सपत्नीक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर ते आज पुन्हा राज ठाकरे यांच्या घरी गेले आहेत.