Ganesh Chaturthi 2023 | मुंबईतील ‘या’ गणपतीला पहिल्याच दिवशी 25 तोळे सोनं, 36 किलो चांदी अर्पण
Ganesh Chaturthi 2023 | तब्बल 360 कोटींचा विमा काढलाय. यात सोन्याच्या आभूषणाच्या विम्याची जी रक्कम आहे, तो आकडा ऐकून डोळे विस्फारतील. भाविकांचा विमा किती हजार कोटींचा आहे?. मुंबईतील हे कुठलं गणेश मंडळ आहे.
मुंबई (निखिल चव्हाण) : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढचे 10 दिवस राज्यात गणेशोत्सवाची धूम असेल. आज घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईत घरघुती गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुर्ती, देखावे आकर्षणाचा विषय असतात. मुंबईत सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मोठ्या उंच गणेशमुर्तींची स्थापना करण्यात येते. मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ विशेष प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून या गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी उसळते. यावर्षी सुद्धा स्थिती वेगळी नाहीय. अगदी कालपासून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. नवसाची पूर्तता झाल्यानंतर लालबागच्या राजाला सुद्धा मोठ्या प्रमाणात देणगी, सोन्या-चांदीच्या वस्तू अपर्ण केल्या जातात.
लालबागच्या राजा प्रमाणेच GSB गणेश मंडळ सुद्धा प्रसिद्ध आहे. मुंबईतील श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडळाची ओळख आहे. इथे गणपतीची सर्वच आभूषण सोन्याची आहेत. जीएसबी गणेश मंडळाच वैशिष्ट्य म्हणजे प्रथा, परंपरा आणि विधी. यंदा 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर असे पाच दिवस गणेशोत्सव साजरा होईल, असं जीएसबी मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या या पाच दिवसात विविध होम, पूजा अर्चना चालते. जीएसबी गणेश मंडळाची मुर्ती ही पूर्णपणे शाडू मातीने साकारण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पहिल्याच दिवशी सोनं, चांदी अर्पण करण्यात आली. ‘भाविक आपला नवस फेडतात. गणहोम, तुला केली जाते’ अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. सोन्याच्या आभूषणांचा विमा किती कोटीचा?
यंदा एका भाविकाने GSB गणपतीला पहिल्याच दिवशी 25 तोळे सोनं अर्पण केलय. नैवेद्याचे 12 बाऊल अर्पण केलेत. एक बाऊल 3 किलो वजनाचा आहे. म्हणजे एकूण मिळून 36 किलो चांदी अर्पण करण्यात आलीय, मंडळाच्या अध्यक्षांनी ही माहिती दिलीय. यंदा जीएसबी गणेश मंडळाने 360 कोटींचा विमा घेतलाय. यात 38 कोटींचा विमा फक्त सोन्याच्या आभूषणांचा आहे. दर्शनासाठी येणारे भाविक, पुजारी यांचा 2895 कोटींचा विमा आहे. जीएसबी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विम्याच सुरक्षा कवच आहे.