Lalbaugcha Raja 2023 | ‘लालबागच्या राजा’च्या मंडपात महिलेला चक्कर, जबाबदारी कोणाची? अजित पवार म्हणतात…VIDEO
Lalbaugcha Raja 2023 | 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला आलेल्या एका महिलेला शनिवारी मंडपात चक्कर आली. त्यावरुन आता वाढत्या गर्दीमुळे जबाबदारी कोणाची हा मुद्दा उपस्थित होतोय. यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केलीय.
मुंबई (रणजीत जाधव) | 24 सप्टेंबर 2023 | मुंबापुरीत सध्या गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. काल पाच दिवसांच्या बाप्पांचा विसर्जन झालं. आज रविवार आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर खासकरुन लालबागमध्ये जास्त गर्दी उसळण्याची शक्यता आहे. परळ-लालबागमध्ये अनेक प्रसिद्ध गणेश मंडळ आहेत. यात ‘लालबागचा राजा’ सर्वदूर प्रसिद्ध आहे. या गणपतीच दर्शन घेतलं की, मनातील इच्छापूर्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून भाविक खास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसात लालबाग परिसर गर्दीने ओसांडून वाहत असतो. यंदाही तेच चित्र आहे. अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी उसळली आहे.
चरणापर्यंत पोहोचता आलं नाही, तरी कमती कमी मुखदर्शन तरी व्हावं. म्हणून भाविक तासनतास रांगते उभे आहेत. नवसाच्या रांगेत काही तास प्रतिक्षा करावी लागते. मुखदर्शनाच्या रांगेतही तीच स्थिती असते. फक्त नवसाच्या रांगेपेक्षा थोडावेळ कमी लागतो एवढच. तासनतास रांगेत उभं राहणं, डोळ्यासमोर सतत गर्दी, पोटात अन्न-पाणी नाही, यामुळे काही भाविकांना शारीरिक त्रास होतो. काल लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला चक्कर आली. तास न् तास रांगेत उभं राहिल्यामुळे या तरुणीला चक्कर आल्याने ती कोसळली. त्यामुळे इतर भाविकांनी लगेच धावून जात तिची मदत केली. तिचे पाय दुखत होते. अचानक तिला घाम फुटला, डोळ्यासमोर गरगरायला लागलं. चक्कर आली. यावेळी आसपासच्या भाविकांनी तिला सावरलं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. अजित पवार काय म्हणाले?
या घटनेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लालबागच्या गर्दीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझ्या कानावर ही बाब पडली. काही भगिनींना तिथं भोवळ आली, त्यानंतर तशी परिस्थिती झाली. लालबागचा राजा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय, अशातच व्हीआयपी जातात. त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंस वाटतं. लालबागचा राजा हा जागरूक गणपती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तिथं दर्शनाला मोठी गर्दी होते. व्हीआयपीसाठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केलेली आहे. तरी ही अशी परिस्थिती उद्भवली, तर गणेश मंडळांची जबाबदारी असते, अन सरकार म्हणून आमचे पोलीस त्यांना सहकार्य करतील”