ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : दहा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर लालबागचा राजाचं विसर्जन करण्यात आलं. या दहा दिवसात लाखो भाविकांनी लालबागचा राजाला भेट दिली. रोज तब्बल सात लाखाच्या जवळपास भाविक लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी येत होते. कुटुंबकबिल्यासह अगदी कर्जत आणि कसाऱ्याहून हे भाविक येत होते. काही भाविक तर मुंबई-ठाण्याच्या बाहेरूनही आले होते. यावेळी अनेक भाविकांनी बाप्पाचा नवस फेडला. तर कुणी बाप्पा चरणी भेटवस्तू अर्पण केल्या. तर काहींनी रोख रक्कम दान केली. या सर्व मौल्यवान भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. तब्बल पाच तास हा लिलाव चालला.
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी ज्या सोने-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू अर्पण केले होते त्याचा काल लिलाव करण्यात आला. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने हा लिलाव केलाय या लिलावात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. अनेक लोकांनी त्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसार लिलावात सोने, चांदी किंवा इतर वस्तू खरेदी केल्या.
जवळपास 35 लाख पेक्षा जास्त रुपयांचा वस्तू लोकांनी लिलावात खरेदी केल्या आहेत. काल रविवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत लिलाव करण्यात आला. बप्पाच्या चरणी भाविकांनी ज्या भेटवस्तू अर्पण केल्या होत्या. त्या सर्व वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, या लिलावातून लालबागचा राजा मंडळाला 35 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न झाले असली तरी लिलावातील एक हार विकला गेला नाही. 55 लाख किंमतीचा हा हार कुणीही खरेदी केला नाही. त्यामुळे आम्ही या हाराचा पुढच्या वर्षी लिलाव करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लालबागच्या राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.
लालबागचा राजासोबत भाविकांचा भावनिक संबंध जोडलेला असतो. हाच त्या वस्तू खरेदी करण्यामागे भाविकांचा हेतू असतो. श्रद्धा आणि बाप्पाच्या प्रसाद म्हणून लोक हे भेटवस्तू लिलावात खरेदी करतात. दरवर्षी लिलावाची ही प्रक्रिया सुरूच असते. या लिलावातून जी काही रक्कम मंडळाकडे जमा होते, त्याचा वापर आम्ही जनतेच्या सेवेसाठी करत असतो, असंही दळवी यांनी सांगितलं.
आम्ही मागील 10 वर्षापासून लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येतो. प्रत्येक वर्षी बाप्पाच्या चरणी आलेली भेटवस्तू खरेदी करत असतो. यंदा मी सोन्याचं कंगन खरेदी केलंय तर मुलाने इलेक्ट्रिक बाइक खरेदी केली आहे. बाप्पाचा प्रसाद म्हणून आम्ही ही खरेदी करत असतो. किमतीच्या काही संबंध नाही. बाप्पाच्या चरणी आलेला प्रसाद घरी घेऊन जायला हवा हीच आमची त्यामागची भावना असते, असं भाविक गौरव चांदवानी यांनी सांगितलं.