Ganesh Chaturthi 2023 | राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, पाहा खास VIDEO
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे आपल्या कुटुंबासह मुकेश अंबानी यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनसाठी गेले. राज ठाकरे आणि अंबानी यांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आलाय.
मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. राज्यभरात घरोघरी दु:खाचं निवारण करणाऱ्या गणरायाचं आगमन झालंय. प्रत्येक सोसायटीत, परिसरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. भक्तांकडून अतिशय वाजत-गाजत, घोषणाबाजी करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलंय. विशेष म्हणजे राज्यातील दिग्गज नेते, अभिनेते, अभिनेत्री, कलाकार, सेलिब्रिटी, उद्योगपतींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालंय. देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालंय. त्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह गेले. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय.
मुकेश अंबानी यांच्या ‘एंटीलिया’ या निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने अंबानींच्या ‘एंटीलिया’ बंगल्यात चांगलीच लगबग बघायला मिळाली. जगभरातील आणि देशातील अनेक नामांकीत व्यक्ती अंबानींच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे देखील अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालंय. त्यांच्या घरी आज सकाळी बाप्पाचं आगमन झालं. त्यानंतर भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले. राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत आले होते. त्यांच्या भेटीचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लोकमान्य टिळकांनी देशातील नागरिकांमधील एकी वाढावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. गणेशोत्सवचा सण खूप ऊर्जा देणारा आहे. या सणाची लहान मुलांपासून वयस्कर आजी-आजोबादेखील वाट पाहत असतात. हा सण आयुष्यात खूप आनंद आणि सुखाचे क्षण आणतो. विशेष म्हणजे माणसं एकत्र येतात. सर्व उणेदुणे बाजूला सारुन या सणाच्या निमित्ताने नातीगोती जपण्याचं काम होतं. माणसं मनाने एकमेकांशी जोडली जातात.