Gatari Amavasya 2023 : श्रावणाच्या आधी मांसाहार प्रेमी का साजरी करतात गटारी? याचे खरे नाव काय आहे?
श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान व्यर्ज्य असल्याने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला मांसाहार आणि मद्य प्रेमी ताव मारतात. खरं तर धार्मिक दृष्टीकोणातून अशी कोणतीही प्रथा नाही. तसेच या अमावस्येला गटारी हे नाव मुळ शब्दाच्या अपभ्रंशामुळे पडले आहे.

मुंबई : मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. श्रावण महिनाभर मद्यपान व मांसाहार वर्ज्य केला जातो. पंचांगानुसार मराठी महिन्यात आषाढी अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक जण मांसाहार आणि मद्यपान करतात. त्यामुळे याला गटारी अमावस्या (Gatari Amavashya 2023) म्हणतात यावेळी गटारी अमावस्या 17 जुलै म्हणजे उद्या आहे. परवापासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. यंदा अधिकमास असल्याने श्रावण महिना हा 49 दिवस चालेल. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना 15 दिवस आधीच सुरु होतो. मराठी श्रावण महिना 18 जुलै म्हणजेच परवापासून सुरु होईल. श्रावण महिन्यात महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात सात्विक आहाराला प्राधान्य देण्यात येते. श्रावणात मांस व मद्य व्यर्ज्य करून सात्विक आहार घेतला जातो. तर उत्तर भारतात ती हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते.
गटारी अमावस्येचे महत्त्व
श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान व्यर्ज्य असल्याने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला मांसाहार आणि मद्य प्रेमी ताव मारतात. खरं तर धार्मिक दृष्टीकोणातून अशी कोणतीही प्रथा नाही. तसेच या अमावस्येला गटारी हे नाव मुळ शब्दाच्या अपभ्रंशामुळे पडले आहे. गताहारी हा मुळ शब्द आहे. गत म्हणजे मागे सोडणे आणि हारी म्हणजे आहार. कांदा, लसून आणि इतर तामसिक गोष्टीच्या आहाराला मागे सोडणे असा त्याचा अर्थ होतो. मात्र मुळ शब्दाचा अपभ्रंश होत गताहारीचे गटारी नामकरण झाले. श्रावण महिना हा पावसाचा असतो. या काळात प्राण्यांमध्ये रोगराईचे प्रमाण जास्त असते. तसेच या कालावधीत पचनक्रियासुद्धा मंदावते. त्यामुळे मांसाहार न करण्याचा सल्ला तज्ञ देतात.
जिवती आणि दीप अमावस्यादेखील होते साजरी
चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या म्हणतात. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने दिवे लावून सर्व देवांची पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.




(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)