Good Friday 2024 : ‘ गुड फ्रायडे ‘ म्हणजे काय ? या दिवशी नेमकं काय झालं होतं ?
गुड फ्रायडे ब्लॅक फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो. इस्टर संडेच्या आधी गुड फ्रायडे साजरा केला जातो आणि ख्रिश्चन समुदायामध्ये हा दिवस सर्वात खास मानला जातो.

गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले अशी मान्यता आहे. त्यांनी मानवतेसाठी केलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ जगभरातील ख्रिश्चन नागरिक गुड फ्रायडे हा दिवस साजरा करतात. हा दिवस ब्लॅक फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो. इस्टर संडेच्या आधी गुड फ्रायडे साजरा केला जातो आणि ख्रिश्चन समुदायामध्ये हा दिवस सर्वात खास मानला जातो. ख्रिश्चन नागरिकांच्या श्रद्धेनुसार, या दिवशी येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगातून वाईटाचा नायनाट करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
ख्रिश्चन नागरिक या दिवशी उपवास करतात. तसेच या दिवशी लोक येशू ख्रिस्ताचे स्मरण करण्यासाठी चर्चमध्ये जातात आणि प्रार्थना करतात. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर (Yeshu) जे आत्याचार झालेत ते पाहता हा दिवस आनंदाचा दिवस मानला जाऊ शकत नाही. मग या दिवसाला गुड फ्रायडे का म्हटलं जातं ? चला जाणून घेऊया.
गुड फ्रायडेला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. यावेळी गुड फ्रायडे 29 मार्च, शुक्रवार म्हणजेच आज आहे. तर 31 मार्च रोजी ईस्टर संडे आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार, दरर्षी गुड फ्रायडे वेगवेगळ्या तारखेला येतो.
गुड फ्रायडेचा इतिहास
लोकांमध्ये येशू ख्रिस्ताची वाढत्या लोकप्रियतेमुळे तिथल्या दांभिक धर्मगुरूंना चीड आली. त्यांनी येशूबद्दल रोमन शासक पिलातकडे तक्रार केली. त्याने पिलातला सांगितले की देवाचा पुत्र असल्याचा दावा करणारा हा तरुण केवळ पापीच नाही तर देवाच्या राज्याविषयीही बोलतो. ही तक्रार आल्यानंतर येशूवर देशद्रोह आणि धर्माचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर येशूला सुळावर चढवून मृत्यूदंड देण्याचा आदेश जारी करण्यात आला. जेव्हा येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तेव्हाही येशू यांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाकडे प्रार्थना केली की, यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत, असे त्यांनी म्हटले. दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे असे म्हटले जाते.
कसा साजरा करतात गुड फ्रायडे ?
गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना केली जाते. ख्रिश्चन नागरिक प्रार्थनेत सहभागी होतात. या दिवशी येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या क्षणांचे आणि बलिदानाचे स्मरण केले जाते. येशू ख्रिस्ताची शिकवण वाचली जाते. त्यांनी सांगितलेले संदेश आणि शिकवण स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)