Gudipadwa 2023: हिंदू नववर्षाचं स्वागत गजकेसरी योगानं, गुढीपाडव्याला सोनं खरेदीचा मुहूर्त जाणून घ्या
गुढीपाडव्याचं हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी सोनं खरेदी केलं जातं.
मुंबई : साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा. यंदाचा गुढीपाडवा ग्रहांच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण सर्वोत्तम योग या दिवशी घडणार आहे. मीन राशीत गुरु ग्रह असून आता शुक्ल पक्षातील चंद्र येणार आहे. मीन राशीतील गुरु चंद्रांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा सर्वोत्तम योग असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. त्यामुळे साडेतीन मुहूर्त आणि गजकेसरी योग असा शुभ मेळ जुळून आला आहे. त्यामुळे शुभ कार्य करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
चंद्र मीन राशीत सव्वा दोन दिवस म्हणजेच 23 मार्चपर्यंत आहे. तर साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची गणना होते. त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ असणार आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10.52 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 मार्च 2023 रोजी रात्री 8.20 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी आहे.
गुढी पूजनाचा मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिटं ते सकाळी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत असणार आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. त्यामुळे सोनं खरेदी संपूर्ण दिवसात कधीही करू शकता.
गुढीपाडव्याला सोनं खरेदी करू शकता शुभ मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदी केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
गुढी पाडव्याचं महत्त्व
हिंदू धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. या दिवशी सूर्यदेव पहिल्यांदा उदीत झाले होते. पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने बालिचा वध केला होता. या दिवशी घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला जातो.