Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा ‘गुढी’ उभारण्याशिवाय अपूर्णच, जाणून घ्या विशेष परंपरा अन् ‘या’ खास पदार्थांचे महत्त्व
हिंदू नववर्षासोबतच मराठी नववर्षाची सुरुवातही चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून होते. याला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज तुम्हाला गुढीपाडव्याशी संबंधित काही खास चालीरीती परंपरेबद्दल सांगणार आहोत,

गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. हिंदू पंचागानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी काही सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालेल्या शहरातून हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा देखील काढल्या जातात. इतंकच नाहीतर गुढीपाडवा हा सण विशेष अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढी उभारणं हा गुढीपाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय, सौभाग्य, आणि समृद्धीच प्रतीक मानलं जातं.
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हा सण महाराष्ट्रात आनंदात साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा ३० मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वर्ष सुरू होतं आणि लोकं नवीन स्वप्ने, आशा आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरांमध्ये खास पदार्थ बनवले जातात. जाणून घ्या महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याशी संबंधित परंपरा आणि चालीरीतींबद्दल…
गुढी उभारणं समृद्धी अन् आनंदाचं प्रतीक
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू आपल्या दारावर, खिडकीत उंच अशी ‘गुढी’ उभारतो. गुढी उभारणं ही हिंदू धर्मात एक परंपरा मानली जाते. यासाठी लाकडी किंवा बांबूची काठी घेतली जाते. त्याच्या वरच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या उलटा लावला जातो. यानंतर, त्यावर सोवळं किंवा नवी कोरी साडी लावली जाते. त्यानंतर कडुलिंबाच्या किंवा आंब्याच्या पानांनी आणि फुलांच्या हारांनी गुढीला सजवले जाते. यामध्ये कडुलिंबाच्या पानांसह साखरेच्या माळेलाही विशेष महत्व असते.
गुढी उभारण्याचे काही धार्मिक महत्त्व देखील असल्याचे सांगितले जाते. गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घरा-घरात सुख आणि समृद्धी आणते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढी उभारण्याचे हेच कारण मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाची सुरूवात होत असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी आणि फुलांची सजावट केली जाते.
कडुलिंबाची पानं आणि गुळाचा प्रसाद खाण्याची प्रथा
गुढी उभारल्यानंतर आणि गुढीपाडव्याची पूजा झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी कडुलिंबाची पाने आणि गूळ किंवा कडुलिंबाची पाने आणि पुरण मिसळून प्रसाद म्हणून वाटला जातो. कारण आरोग्याच्या दृष्टिने याला खूप महत्त्व असून ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. काही लोक त्यात धणे आणि चिंच देखील घालतात, ज्यामुळे त्याची चव वाढते. जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचे संतुलन राखण्याचे प्रतीक म्हणून असा प्रसाद वाटण्याची प्रथा आहे.
‘या’ खास पारंपारिक मराठमोळ्या पदार्थांना महत्त्व
गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक पदार्थ आवर्जून बनवले जातात. यामध्ये पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, साबुदाणा वडा, आंब्याचा रस आणि पुरी अशा पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांसह कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येऊन या खास दिवसाचा आनंद घेतात आणि नववर्षाचे स्वागत करतात.