होळीचं पाकिस्तानसोबत आहे खास कनेक्शन; इथूनच झाली रंगोत्सवाची सुरुवात
होळी हा भारतामध्ये दिवाळीनंतर साजरा करण्यात येणारा सर्वात मोठा सण आहे. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी फाल्गुन महिन्यामध्ये हा सण सजरा करण्यात येतो.

होळी हा भारतामध्ये दिवाळीनंतर साजरा करण्यात येणारा सर्वात मोठा सण आहे. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी फाल्गुन महिन्यामध्ये हा सण सजरा करण्यात येतो. हिंदू धर्मामध्ये मोठ्या धूमधडाक्यात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. भारताबाहेर देखील ज्या देशांमध्ये हिंदू राहतात त्या देशांमध्ये देखील हा होळीचा सण साजरा करण्यात येतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की पाकिस्तानमध्ये अशी देखील एक जागा आहे, त्या जागेचं होळी या सणाशी खास कनेक्शन आहे. एक काळ असा होता, तेव्हा पाकिस्तानमध्ये तब्बल 9 दिवस होळीचा उत्सव साजरा करण्यात येत होता.
यावेळी भारतासोबतच जगभरात येत्या 14 मार्च रोजी होळी साजरी होणार आहे. 13 मार्च रोजी होलिका दहन आहे. त्यानंतर 14 मार्चला देशभरात मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा करण्यात येईल. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा आहे. तशीच होळीच्या सणामागे देखील आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक म्हणून हा सण साजरा केला जातो. भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा खूप मोठा भक्त होता, मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यप ला आपल्या मुलाने भगवान विष्णू यांची पूजा केलेली आवडत नव्हती, त्यामुळे हिरण्यकश्यप याने आपली बहीण होलिकेच्या मदतीनं आपल्या मुलाला मारण्याचा प्लॅन बनवला. हिरण्यकश्यपची बहीण होलिकेला आगीमध्ये न जळण्याचं वरदान प्राप्त होतं. मात्र जसं तीने भक्त प्रल्हादसह अग्नीत प्रवेश केला तशी ती जळून खाक झाली. मात्र भक्त प्रल्हादला विष्णूंच्या कृपेमुळे काहीही झालं नाही, तेव्हापासून हा सण साजरा करण्यात येतो. आता जाणून घेऊयात या सणाचं नेमकं पाकिस्तान कनेक्शन काय आहे ते?
स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले. मात्र ही घटना तेव्हाच्या भारतामध्ये म्हणजेच आजच्या पाकिस्तानमध्ये घडली आहे. जिथे होलिकाने भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये प्रवेश केला होता. ती जागा आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुल्तान शहरात आहे. तिथे भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचं एक मंदिर देखील आहे. एक काळ असा होता की या शहरामध्ये होळीचा उत्सव तब्बल 9 दिवस चालायचा, आता मात्र या मंदिराकडे दुर्लक्ष झालं असून, या मंदिराची दुरावस्था झाली आहे.