लक्ष्मी देवीची या 3 राशींवर विशेष कृपा, असा होतो फायदा, तुमची रास कोणती?
Lakshmi Devi Favourite Zodiacs : ज्योतिष शास्त्रानुसार एकूण राशींपैकी 3 राशींवर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते. त्यामुळे या 3 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी कायम राहते. जाणून घ्या त्या 3 राशींमध्ये तुमची रास आहे की नाही?

हिंदू धर्मात लक्ष्मी देवीची पुजा करणं फार शुभ आणि लाभदायक असल्याची मान्यता आहे. दररोज लक्ष्मी देवीची उपासना केल्याने धन, वैभव, सुख-संपत्तीत भरभराट होते. शास्त्रानुसार, ऐश्वर्य, संपत्ती आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी आहे. लक्ष्मी देवीचा ज्या व्यक्तीवर आशीर्वाद असतो, त्याच्या आयुष्यात समृद्धी आणि आनंद असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मी देवीचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र ग्रह हा सुख, वैवाहिक जीवन, समृद्धी आणि प्रेम निर्माण करणारा ग्रह मानला जातो. जेव्हा कुंडलीत शुक्र बलवान असतो तेव्हा जीवनात भरपूर सुखसोयी असतात. लक्ष्मी देवीचा कोणत्या 3 राशींच्या लोकांवर विशेष आशीर्वाद असतो? हे जाणून घेऊयात.
वृषभ राशी
शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे लक्ष्मी देवीची या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असते. वृषभ राशीच्या लोकांना भरपूर भौतिक सुख, संपत्ती आणि यश मिळते. शुक्र आणि लक्ष्मी देवीच्या प्रभावामुळे वृषभ रास असलेल्यांना करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात अपेक्षित यश मिळतं. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा रहावी यासाठी शुक्रवारी पूजा करावी. तसेच लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करावा.
सिंह राशी
सिंह ही राशीदेखील लक्ष्मी देवीच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. सिंह या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याला ग्रहांचा राजा असंही म्हटलं जातं. लक्ष्मी देवीच्या कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात नफा, सरकारी क्षेत्रात यश आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, तसेच आशीर्वाद कायम रहावा यासाठी प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने आपलं काम करावं. तसेच सिंह राशीच्या लोकांनी पौर्णिमेला लक्ष्मी-नारायणाची पूजा करावी.
तूळ राशी
वृषभ आणि सिंह राशीप्रमाणे तूळ राशीवरही शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे तूळ राशीवर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो, असं म्हटलं जातं. तूळ राशीची लोकं संतुलित, मितभाषी, संयमी असतात. लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे तूळ राशीची लोकं आरामदायी जीवनाचा आनंद घेतात. लक्ष्मी देवीची कृपा रहावी, यासाठी तूळ राशीच्या लोकांनी दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला गुलाबाचं फुल अर्पण करावं. त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते, अशी मान्यता आहे.
(Disclaimer: वरील माहिती ही सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)