Purna Chandra Grahan : मार्चमध्ये रक्तासारखा लाल होईल चंद्र, खगोल शास्त्रज्ञ का वाट पाहत आहेत या घटनेची?
मार्च 2025 मध्ये एक आश्चर्यकारक खगोलीय घटना घडणार आहे. पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला लाल चंद्रग्रहण म्हणतात. हे ग्रहण 14 मार्च रोजी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला होईल, परंतु भारतात दिसणार नाही. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आफ्रिकेतील काही भागात ते स्पष्टपणे दिसेल.

Purna Chandra Grahan 2025 : पुढच्या महिन्यात एक अद्भूत घटना घडणार आहे. मार्च महिन्यात अशी घटना घडणार आहे की ज्याचा खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत. पुढच्या महिन्यात पूर्ण चंद्र ग्रहण लागणार आहे. पूर्ण चंद्र ग्रहणाला ब्लड मून म्हटलं जातं. 2022नंतर आता हे अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी पूर्ण चंद्र ग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी लागलं होतं. हा ब्लड मून जगातील काही देशात दिसला होता. संपूर्ण रक्तासारखा लाल चंद्र दिसला होता.
ज्योतिष गणनेनुसार, यंदा वर्षाचं पहिलं चंद्र ग्रहण 14 मार्च रोजी फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला लागणार आहे. हे पूर्ण चंद्र ग्रहण असेल. पण भारतात हे चंद्र ग्रहण किंवा ब्लड मून दिसणार नाही. पूर्ण चंद्र ग्रहण जवळपास 65 मिनिटे लागेल. ग्रहणाच्यावेळी चंद्राचा सफेद रंग बदलून फिक्कट किंवा भूरकट लाल रंग होईल. चंद्र ग्रहण रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल. आणि पहाटे 6 वाजता संपेल.
अमेरिकेत 13 मार्च रोजी दिसेल
उत्तर अमेरिकेत चंद्र ग्रहण 13 मार्च रोजी दिसेल. पूर्व क्षेत्रात आंशिक ग्रहण रात्री 1 वाजून 9 मिनिटांनी आणि पूर्ण ग्रहणाचा अवधी 2 वाजून 26 मिनिटांपासून 3 वाजून 32 मिनिटापर्यंत राहील. पश्चिम क्षेत्रात चंद्रग्रहणाबाबत सांगायचं तर आंशिक ग्रहण रात्री 10 वाजून 9 मिनिट आणि पूर्ण ग्रहण 11 वाजून 26 मिनिटापासून 12 वाजून 32 मिनिटापर्यंत असेल.




ब्लड मून काय असतं?
‘ब्लड मून’ हा शब्द पूर्ण चंद्र ग्रहणासाठी वापरला जातो. जेव्हा पृथ्वी, सूर्याकडे चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची संपूर्ण सावली चंद्रावर पडते तेव्हा पूर्ण चंद्र ग्रहण होते. जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वायु मंडळातून जातो, तेव्हा त्यातून निळा आणि हिरवा प्रकाश येतो. तसेच लाल आणि नारंगी प्रकाश चंद्रावर पडतो. त्यामुळे चंद्र लाल किंवा फिक्कट रंगात दिसतो. त्यालाच ब्लड मून म्हटलं जातं.
कुठे दिसेल?
यावेळी ब्लड मून किंवा पूर्ण चंद्र ग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, कॅनडा, मॅक्सिको, ब्राझिल आणि चिली, यूरोप आणि आफ्रिकेतील काही भागात आंशिक दिसणार आहे. उघड्या आकाशात लाल चंद्र स्पष्टपणे दिसेल. ज्या ठिकाणी ब्लड मून दिसणार नाही, त्या देशातील लोक ऑनलाई लाइव्ह पाहू शकतात.