Vinayaki Chaturthi: आज मार्गशीष महिन्यातील विनायकी चतुर्थी, मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
आज मार्गशीष महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. जाणून घेऊया काही उपाय.
मुंबई, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. चतुर्थी हे गणपतीला समर्पित व्रत आहे. आज मार्गशीष महिन्यातील विनायक चतुर्थी (Margashish Vinayak Chaturthi) आहे. श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवसाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. जो कोणी विनायक चतुर्थीचे व्रत खऱ्या भक्तिभावाने पाळतो, त्याला श्रीगणेश ज्ञान, समृद्धी, सौभाग्य, बुद्धी इत्यादींचा आशीर्वाद देतात.
मार्गशीष विनायक चतुर्थीचे महत्व
धार्मिक मान्यतेनुसार कुठल्याही मंगल कार्याच्या सुरवातीला गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. विनायक चतुर्थी संकट दूर करण्यासाठी साजरी केली जाते. असे मानले जाते की, भक्ती भावाने हे व्रत पाळणाऱ्याच्या आयुष्यात श्रीगणेशाच्या कृपेने सुख, समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. श्रीगणेश भक्तांच्या जीवनातील सर्व वाईट परिणामही दूर करतात. संतती सुखासाठीदेखील हे व्रत पाळल्या जाते. हिंदू पंचांगानुसार, मार्शिश महिन्याची विनायक चतुर्थी 26 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारी संध्याकाळी 07.28 वाजता सुरू झाले आहे आणि ते 27 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 04.25 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार मार्गशीष विनायक चतुर्थी व्रत 27 नोव्हेंबरलाच साजरे केले जात आहे.
अशा प्रकारे करा श्रीगणेशाची पूजा
विनायक चतुर्थीला सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यानंतर गणेशाची पूजा करावी. पूजेत नारळ आणि मोदक यांचा समावेश करावा. याशिवाय पूजेत गणेशाला गुलाबाचे फूल आणि दूर्वा अर्पण करा. धूप, दिवा, नैवेद्य अर्पण केल्यानंतर “ओम गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करावा. गणपतीची कथा वाचा, आरती करा, पूजेत सहभागी असलेल्या सर्वांना प्रसाद वाटप करा. सायंकाळी गणेशाची पूजा करावी.
या उपायांनी मिळेल श्रीगणेशाचा आशीर्वाद
- या दिवशीच्या पूजेमध्ये गणपतीला दुर्वा माळा अर्पण करा. त्यांना तूप आणि गूळ अर्पण करा. आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा थांबलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रार्थना करा. पूजेनंतर गाईला तूप आणि गूळ खायला घाला किंवा गरजूंना दान करा.
- जीवनातील कोणत्याही प्रकारचे संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशाच्या समोर तुपाचा दिवा लावा. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचा 3 वेळा पठण करा. लाडूचा नैवेद्य दाखवा.
- संततीच्या भवितव्यासाठी या श्रीगणेशाला पंचामृताने अभिषेक करा. गणपतीसमोर तुपाचा दिवा लावावा. मोदकाचा नैवेद्य दाखवा पूजेनंतर पूजेनंतर एक मोदक तुमच्या मुलाला/मुलीला प्रसाद म्हणून खायला द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)