Nag Panchami 2022: नागांशी जोडलेले तक्षक तिर्थस्थान, पूजेमुळे दूर होतो कुंडलीतील कालसर्प दोष
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजेच नागपंचमीचा दिवस होय. या दिवशी सापांच्या जातीतील तक्षक नागाच्या पूजेचं विशेष महत्व असतं.
Nag Panchami 2022: श्रावण महिन्यातील (Sharwan) शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजेच नागपंचमीचा (Nag panchami) पवित्र दिवस असतो. या दिवशी नाग देवतांशी संबंधित प्रमुख मंदिरांमध्ये विशेष पूजेचं महत्व असतं. नागांशी जोडल्या गेलेल्या प्रमुख पवित्र तिर्थस्थानांमध्ये तक्षक (Takshak)तिर्थस्थानाचे विशेष महत्व आहे. पाताळात निवास करणाऱ्या आठ प्रमुख नागांमध्ये तक्षक नागाला संपूर्ण सर्पजातीचा स्वामी मानलं जातं. ज्यांची कोणत्याही महिन्यातील शुक्ल पंचमीला पूजा केल्यामुळे विषबाधा आणि दोष दूर होतात. श्रावण महिन्यात तक्षक तिर्थस्थानावर विधिवत पूजा, रुद्राभिषेक केल्यामुळे केवळ ती व्यक्तीच नव्हे तर त्यांच्या वंशजही सर्प दंशाच्या दोषातून मुक्त होतात. तक्षक तिर्थस्थानाशी संबंधित पौराणिक कथा आणि बाबा तक्षकेश्वरनाथ यांच्या पूजेचे धार्मिक महत्व जाणून घेऊया.
कुठे आहे तक्षक तिर्थस्थान ?
नागांशी जोडलेले पवित्र तक्षक तिर्थस्थान, प्रयाग येथील यमुनेच्या तटावर आहे. प्रयागराज येथील दरियाबाद गल्लीत असलेल्या या पवित्र जागेला बडा शिवाला नावाने ओळखले जाते. या जागी तुम्ही रेल्वे, विमान अथवा रस्त्यामार्गेही पोचू शकता.
पौराणिक कथा
तक्षक तिर्थस्थानाशी जोडलेल्या कथेचं वर्णन श्री प्रयाग महात्म्य शताध्यायी यातील 92 व्या अध्यायात मिळते. त्यानुसार अश्विनी कुमारांनी किष्किंधा पर्वतावर प्रचंड कष्टाने पाऱ्याचा रसराज तयार केला आणि तो गुहेत ठेवून निघून गेले अश्विनी कुमार जेव्हा तिथे पुन्हा परत आले तेव्हा ते पाऱ्याचा रसराज असलेले पात्र रिकामे झाले होते. तेव्हा अश्विनी कुमार स्वर्गात गेले आणि या घटनेची माहिती त्यांनी देवांचा राजा, इंद्राला दिली. इंद्राने तत्काळ चोराचा शोध घेण्याचे व त्याला दंड देण्याचे आदेश दिले. हा संपूर्ण घटनाक्रम जव्हा तक्षक नागाला समजला तेव्हा तो पाताळातून प्रयागराज येथे यमुनेच्या तटावर येऊन राहू लागला. बऱ्याच शोधानंतरही जेव्हा तक्षक नागाचा शोध लागला नाही तेव्हा गुरू बृहस्पती यांनी याबाबतचं रहस्य उघड करत त्यांना सांगितलं की, तक्षक नागाने तिर्थांचा राजा प्रयागराजमध्ये आश्रय घेतला आहे. तसेच तो नेहमी भगवान माधवाचं नामस्मरण करत ध्यान करत असतो. त्यामुळे त्यांचा वध करणं अशक्य आहे. हे ऐकताच (इंद्र) देवता शांत झाले. तेव्हापासून आजपर्यंत तक्षक नाग याच पवित्र तिर्थस्थानी निवास करतो, असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी मथुरेतून पळवून लावल्यानंतरही तक्षक नाग प्रयागराज येथील यमुनेच्या तटावरील तक्षकेश्वर कुंड येथे शरण आला होता.
तक्षक तीर्थस्थानाचे धार्मिक महत्व
विष्णु पुराणानुसार, तक्षक तिर्थस्थान हे सर्व तिर्थस्थानांचे पुण्य फळ देणारे आणि सर्व प्रकारचे विष दूर करणारे असे मानले जाते. पद्म पुराणानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी शंकराला रुद्राभिषेक आणि पूजा करणे महत्वपूर्ण ठरते. मार्गशीर्ष आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी तक्षक तिर्थस्थानी पूजा करण्यासाठी मोठी गर्दी उसळते.
यमुनेच्या तीरावरील तक्षक कुंडात स्नान केल्याने आणि तक्षकेश्वराची पूजा , जप, दान केल्यामुळे त्या व्यक्तीशी जोडलेलले सर्व प्रकारचे दोष आणि सर्पदंशांपासून मुक्ती मिळते, अशी इथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. या पवित्र दिवशी शंकराची विधिवत पूजा, रुद्राभिषेक केल्याने साधकाला सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते.
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.)