Navratri 2022: शत्रूवर विजय मिळविण्यासाठी करा देवी कात्यायनीची पूजा, नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचे महत्त्व
आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या कात्यायनी या रूपाचे पूजन केले जाते. शत्रूवर विजय मिळविण्यासाठी अशा प्रकारे देवीची उपासना करावी.
मुंबई, नवरात्रीच्या (Navratri 2022) सणाचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय. विशेषतः कोरोना काळानंतरचे हे पहिले निर्बंधमुक्त नवरात्र असल्याने गरबा दांडियाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. नवरात्रीचा पवित्र सण शक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, दुर्गा देवीच्या (Durga Devi) 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यामध्ये सहाव्या दिवशी माता कात्यायनीची (Katyayani) पूजा केली जाते. या दिवशी देवीची आराधना करताना भक्त आपले चित्त अग्या चक्रात स्थापित करतो. पौराणिक मान्यतेनुसार, महर्षी कात्यायन यांच्या कन्येच्या रुपात देवीच्या या पवित्र रूपाला भक्त कात्यायनी म्हणतात.
कात्यायनी मातेला महिषासुरमर्दिनी म्हणतात. शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुःख दूर करणारी आणि इच्छित वरदान देणाऱ्या कात्यायनी मातेची पूजा पद्धत, मंत्र, धार्मिक महत्त्व आणि उपाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
देवी कात्यायनीचे रूप
पौराणिक मान्यतेनुसार, आपल्या भक्तांची सर्व दु:खं क्षणभरात दूर करणारी माता कात्यायनी हिला चार हात असून एक हात व्रमुद्रेत आणि दुसरा अभय मुद्रेत आहे, तिसर्या हातात कमळाचे फूल आहे. चौथ्या हातात तलवार आहे. कात्यायनी देवीचे वाहन सिंह आहे.
अशी करा देवीची उपासना
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर सर्व प्रथम कात्यायनीची देवीची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना एका चौरंगावर लाल कपडा टाकून करावी. यानंतर सर्व प्रथम गणपतीचे ध्यान करावे आणि त्यानंतर कात्यायनी मातेला रोळी, अक्षत, फुले, धूप, दिवा, सुपारी, लवंग, फळे इत्यादी अर्पण करून विधिपूर्वक पूर्ण करावे. देवीला मधाचा नैवेद्य दाखवा. यानंतर कात्यायनी देवीची कथा वाचा. किमान एक जपमाळ ‘कात्यायनी देवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचे पठणही करावे.
कात्यायनी देवीच्या पूजेचे फायदे
असे मानले जाते की देवी दुर्गेच्या कात्यायनी रूपाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवीच्या आशीर्वादाने त्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे चारही मिळतात. कात्यायनीची पूजा केल्याने साधकाला शत्रूंवर विजय प्राप्त होतो. शत्रूवर विजय मिळविण्यासाठी कात्यायनी देवीचे स्मरण करावे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)