Navratri Nine Colours 2023 : नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रोत्सोवात परिधान करा या नऊ रंगांचे कपडे
शारदीय नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये भाविक विविध नियमांचे पालनही करतात. त्यातील एक नियम असा आहे की पूजेच्या वेळी भक्ताने देवीचा आवडता रंग (Navratri Nine colours 2023) लक्षात घेऊन कपडे घालावेत. याशिवाय पूजेच्या वेळी परिधान केलेले कपडे घाण किंवा फाटलेले नसावेत, याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे.
मुंबई : लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक शारदीय नवरात्री अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ प्रमुख रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. शारदीय नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये भाविक विविध नियमांचे पालनही करतात. त्यातील एक नियम असा आहे की पूजेच्या वेळी भक्ताने देवीचा आवडता रंग (Navratri Nine colours 2023) लक्षात घेऊन कपडे घालावेत. याशिवाय पूजेच्या वेळी परिधान केलेले कपडे घाण किंवा फाटलेले नसावेत, याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे. नवरात्रीतील रंगांचे महत्त्व आणि देवी भगवतीच्या नऊ रूपांशी त्यांचा संबंध जाणून घेऊया.
नऊ दिवसांचे नऊ रंग
देवी शैलपुत्री : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. या दिवशी मातेची पूजा करताना साधकाने ऑरेंज म्हणजे संत्रा रंगाचे कपडे परिधान करावेत. असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते.
देवी ब्रह्मचारिणी : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी साधकाने पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
देवी चंद्रघंटा : नवरात्रीच्या तृतीया तिथीला माता चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी साधकाने लाल रंगाची वस्त्रे परिधान करून मातेची पूजा करावी. असे केल्याने त्यांना आरोग्य आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
देवी कुष्मांडा : चतुर्थी तिथीला कुष्मांडा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. कुष्मांडा माता ही निसर्गदेवता आहे. त्यामुळे या दिवशी भक्तांनी रॉयल ब्लू म्हणजे गडद निळ्या रंगांचे कपडे घालूनच त्यांची पूजा करावी.
देवी स्कंदमाता : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा करावी. असे केल्याने साधकाला आरोग्य, ज्ञान आणि मुलांचे सुख प्राप्त होते.
देवी कात्यायनी : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी महिषासुर मर्दिनी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. या दिवशी भक्तांनी हिरव्या रंगाचे कपडे घालून त्याची पूजा करावी. असे केल्याने कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होऊन साधकांना लाभ होतो.
देवी कालरात्री : नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी काही साधकांकडून तंत्रसाधनाही केली जाते. देवी कालरात्रीची पूजा करताना भक्ताने तपकिरी म्हणजे ग्रे रंगाचे कपडे परिधान करावेत. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
देवी महागौरी : अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते. माता महागौरीला जांभळा सर्वात जास्त आवडतो. या दिवशी त्याची पूजा करताना भक्तांनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
देवी सिद्धिदात्री : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. माता सिद्धिदात्री ही सर्व सिद्धींची देवी आहे. या दिवशी त्यांची पूजा करण्यासाठी भक्तांनी मोरपंखी रंगाचे कपडे परिधान करावेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)