नांदेड : नृसिंह हा भगवान विष्णुच्या दशावतारांमधील चौथा अवतार आहे.नृसिंहाचे नवरात्र वैशाख शुद्ध षष्ठी ते चतुर्दशी असे साजरे केले जाते.प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस नृसिंहव्रत, गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीस त्रयोदशी व्रत, फाल्गुन वद्य द्वादशीस द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते. शनिवार हा नृसिंहाचा वार सांगितला आहे.पंचमुखी हनुमान स्तोत्रांत पूर्वेकडे वानरमुख व दक्षिणेकडे नृसिंहमुख असे म्हटले आहे. अत्युग्रतेजो ज्वलंतम् भीषणं भयनाशनम् असे या मुखाचेवर्णन आहे. पश्चिमे कडील मुख गरुडाचे असून उत्तरेकडील मुख भगवान वराहांचे आहे. पांचवे मुख हयानन म्हणजे घोड्याचे तुंबरु स्वरुपांतील आहे. या पंचमुखी हनुमान स्वरुपांत भगवंताचे दोन अवतार आहेत व तीन अवतार भक्त स्वरुपांत आहेत. म्हणून हनुमंताचे पूजा, उपासनेने नृसिंहांची पूजा, उपासना आपसूकच घडते.
या ठिकाणी भक्त व भगवान एके ठिकाणी आहेत. असा हा हनुमंताचा अवतार आहे.
मूर्तीस स्नान घालावे. नंतर पंचामृत, पंचगव्य आदीने स्नान घालावे. मग कुंकूम, चंदन, केशर यांचे लेपन करावे. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस आदी फुलांनी पूजा करावी. मग तूप, साखर, तांदूळ, जव आदीच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी असे नृसिंह पुराणांत सांगितले आहे. कलियुगांत जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन, त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो.
हे व्रत विष्णुभक्तांनी व संकटनाशाची इच्छा करणारांनी दरवर्षी वैशाख शुक्ल चतुर्दशीला निष्ठेने करावे. व्रताचे पंचामृतस्नान, पूजा व उपवास असे हे तीन मुख्य विधी आहेत. ह्या व्रतास चतुर्दशीच्या दिवशी माध्यान्ह कालापासून सुरुवात करुन दुसऱ्या दिवशी घरातील सर्वानी एकत्र उपवास सोडावा व सांगता करावी.
चतुर्दशीच्या दिवशी दुपारी अंगाला मृतिका, गोमय, आवळे व तीळ लावून स्वच्छ स्नान करावे. जवळ नदी, समुद्र असेल तर तेथे जाऊन स्नान करावे.
पूजेस सुरुवात करण्याआधी श्रीनृसिंहाची खालील प्रमाणे प्रार्थना करावी.
नृसिंहं देवदेवेशं तव जन्मदिने शुभे ।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितम् ।
श्रीनृसिंहमहोग्रस्त्वं दयां कृत्वा ममोपरि ।
अद्याहं प्रविधास्यामि व्रतनिर्विघ्नतां नय ।
मनोकामना पूर्ण होतात, पुत्र प्राप्तीची अपेक्षा असेल तर तसे होते मात्र पूर्ण भक्तीयुक्त अंतःकरणाने हे व्रत करावे. घरांतील कटकटी दूर होतात व संसार सुखाचा होतो. निर्धनी कुबेर होतो. शत्रुनाश होतो. भूतबाधा दूर होते.