Pradosh Vrat : आज भाद्रपद महिन्यातले प्रदोष व्रत, अशा प्रकारे करा महादेवाची उपासना
हिंदू मान्यतेनुसार, भगवान शिव आणि त्यांचा पुत्र म्हणजेच बुद्धीचा दाता गणपती बुधवारी प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण आशीर्वाद देतात. शिवाच्या कृपेने साधकाला सर्व प्रकारची सुख-साधने मिळतात आणि अडथळे त्याच्या जवळही येत नाहीत.
मुंबई : हिंदू धर्मात, भगवान शिवाची उपासना फलदायी मानली जाते कारण भगवान भोलेनाथ हे शिघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत. हिंदू धर्मात सोमवार, प्रदोष तिथी आणि शिवरात्री हा सण शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष तिथी असून बुधवारी आल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण या दिवसांत गणेशोत्सवही सुरू आहे. बुध प्रदोष व्रताची (Pradosh Vrat) पूजा करण्याची पद्धत आणि उपाय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पूजेचा मुहूर्त
उदय तिथीनुसार प्रदोष व्रताची तिथी 27 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज पहाटे 1:45 वाजता सुरू होईल. त्रयोदशी तिथी समाप्त होईल – 27 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 10:08 वाजता प्रदोष काळात पूजा – 27 सप्टेंबर, संध्याकाळी 6:12 ते रात्री 8:36
शिव-गणेशाची पूजा केल्याने होईल लाभ
बुध प्रदोषाच्या दिवशी स्नान करून स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घाला. गणपतीसमोर तुपाचा दिवा लावा आणि 108 वेळा गणमंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा. प्रदोष काळात संध्याकाळी भगवान शंकराला पंचामृताने (दूध, दही, तूप, मध आणि साखर) स्नान घालावे, त्यानंतर त्यांना शुद्ध पाण्याने आंघोळ घालावी. धूप आणि दिवा लावून त्यांची पूजा करावी. भगवान शंकराला पांढऱ्या तांदळाची खीर अर्पण करा. आसनावर बसून शिवाष्टकांचे पठण करा आणि सर्व बाधा – दोष दूर करण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा.
बुध प्रदोष व्रताचे लाभ
हिंदू मान्यतेनुसार, भगवान शिव आणि त्यांचा पुत्र म्हणजेच बुद्धीचा दाता गणपती बुधवारी प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण आशीर्वाद देतात. शिवाच्या कृपेने साधकाला सर्व प्रकारची सुख-साधने मिळतात आणि अडथळे त्याच्या जवळही येत नाहीत. बुध प्रदोष व्रत केल्यास शिवासह गणपती आणि बुध ग्रहाचा आशीर्वाद होतो. ज्यामुळे व्यक्तीला शक्ती, बुद्धी आणि शुभाचे वरदान मिळते. हिंदू मान्यतेनुसार जी स्त्री प्रदोष व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पाळते, तिच्या पतीला आणि मुलाला दीर्घायुष्य लाभते आणि महादेव तिच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)