Ram Mandir : रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त बेळगावात वाटले जाणार 4 लाख लाडू
घरोघरी लाडू वितरित करण्याच्या कार्याला आज पासून प्रारंभ करण्यात आला आहे.श्री रामाचे टॅटू काढून घेण्यासाठी तीन हजार व्यक्तींनी नाव नोंदणी केली आहे. केवळ बेळगाव नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील नाव नोंदणी केली आहे.एकूण पाच ठिकाणी टॅटू काढण्यासाठी केंद्र उघडण्यात आली आहेत.
बेळगाव : अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्री रामाची (Shri Ram) प्रतिष्ठापना होणार असल्याने बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी चार लाख मोतीचुर लाडू वितरित करण्याचा आणि दहा हजार व्यक्तींच्या हातावर श्री रामाचे टॅटू काढण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या दोन दिवसापासून लाडू तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी राजस्थानहून चाळीस आचारी बोलावण्यात आले आहेत.एकूण ऐंशी हजार घरामध्ये डब्यातून लाडू वितरित करण्यात येणार आहेत.एका डब्यात पाच लाडू असणार आहेत. लाडू तयार करण्याच्या कामात आमदार अभय पाटील यांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.
यामधे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.घरोघरी लाडू वितरित करण्याच्या कार्याला आज पासून प्रारंभ करण्यात आला आहे.श्री रामाचे टॅटू काढून घेण्यासाठी तीन हजार व्यक्तींनी नाव नोंदणी केली आहे. केवळ बेळगाव नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील नाव नोंदणी केली आहे.एकूण पाच ठिकाणी टॅटू काढण्यासाठी केंद्र उघडण्यात आली आहेत. महीलांच्यासाठी टॅटू काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
दिव्यांग धीरज कळसाईत सायकलने अयोध्याला निघाला
अकोट जिल्हातल्या अकोट शहरातील एक हात व पाय नसलेला पंचवीस वर्षीय दिव्यांग धीरज कळसाईत हा सोमवारी सायकलने अयोध्याला निघाला असून धीरजचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले. दिव्यांग धीरज कळसाईत याने 1 हजार 51 किलो मीटर असलेल्या अयोध्या सायकलवारी अकोला शहरातील गजानन नगर येथील संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन प्रारंभ केली सहा दिवसांनी अयोध्येला पोहचेल. तर यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद व इतर हिंदू संघटनांनी रॅली काढली होती.
देशभर राबविले जात आहे मंदिर स्वच्छता अभियान
रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभर राबविले जात आहे मंदिर स्वच्छता अभियान, चंद्रपुरातही अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरांमध्ये स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली. चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील हनुमान मंदिरात स्वच्छता अभियान राबवून मोहिमेचा करण्यात आला प्रारंभ, पुढील काही दिवसात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नागरिक योगदान देणार आहेत. सिविल लाईनच्या हनुमान मंदिरातही यज्ञ-याग व पूजेद्वारे प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे.
उल्हासनगरमध्येही साजरा होणार उत्सव
2 जानेवारीला अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या उत्साहाची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. परंतु सर्वांनच अयोध्येला जाऊन हा राममंदिर उद्घाटन सोहळा पाहता येणार नाही. म्हणून उल्हासनगरातील भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांच्या पुढाकाराने कॅम्प नंबर 2 येथील गोलमैदानमध्ये श्रीराम मंदिराची झांकी बनवण्यात आली आहे.
उल्हासनगरातील सर्व नागरिकांना येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच येथे रोज संत साधू येऊन भजन आणि सत्संग कार्यक्रम करणार आहेत. यावेळी दररोज गोलमैदानात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आमदार कुमार आयलानी यांनी सर्व नागरिकांना गोलमैदानात येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.