आनंद पोटात माझ्या माईना… डोळेभरून पाहू की काळजात ठेवू, रामलल्लाची मूर्ती अखेर आली समोर
Ramlala Latest Photo रामललाच्या मूर्तीचा फोटो नुकताच समोर आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट पाहाता येत आहे. मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे जी त्याचे भव्य बालस्वरूप दर्शवते.
अयोध्या : कोट्यावधी राम भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो नुकतेच समोर आले आहे. अयोध्येच्या भव्य राम मंदिरात विराजमान होणाऱ्या रामललाच्या मूर्तीचा फोटो (Ramlala Latest Photo) नुकताच समोर आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट पाहाता येत आहे. मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे जी त्याचे भव्य बालस्वरूप दर्शवते. भगवंतांच्या कपाळावर तिलक असून एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण आहे. रामललाच्या चेहऱ्यावर हलके हसू आहे आणि त्यांचे डोळे उघडे आहेत. मात्र, रामललाचा हा फोटो गर्भगृहात बसण्यापूर्वीचा आहे. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच गुरुवारी राम मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, गर्भगृहात ठेवण्यात आलेली मूर्ती अद्यापही झाकून ठेवण्यात आली असून ती अभिषेकदिनी उघडण्यात येणार आहे. स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीची उंची 51 इंच इतकी आहे.
अशाप्रकारे पार पडला आजचा विधी
म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे. माहिती देताना अभिषेक सोहळ्याशी संबंधित पुजारी अरुण दीक्षित यांनी सांगितले की, दुपारी वैदिक मंत्रोच्चारात रामाची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली होती. यावेळी प्राण प्रतिष्ठाचे मुख्य यजमान अनिल मिश्रा उपस्थित होते. गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी तब्बल 4 तास लागले. गाभाऱ्यात मूर्ती ठेवण्यापूर्वी विधीही पूर्ण करण्यात आले. यामध्ये धान्य, फळे, तूप आणि पाण्याने केलेल्या स्नानाचाही समावेश होता. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले होते की, राममूर्ती यांनी अयोध्येतील जन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात दुपारी 12.30 नंतर प्रवेश केला. त्यानंतर दुपारी 1.20 वाजता यजमानांनी मुख्य संकल्प केल्यावर तेथील वातावरण वेदमंत्रांच्या गजराने मंगलमय झाले. गुरुवारी मूर्तीच्या विसर्जनापर्यंतची सर्व कामे पूर्ण झाली.
योगी आदित्यनाथही आज अयोध्येत
अयोध्येत अभिषेकाची तयारी सुरू आहे. संपूर्ण अयोध्या सजवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आणि जगातील अनेक दिग्गज व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्राणप्रतिष्ठा संदर्भात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.