AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या विशेष शंखाचे जल भगवान विष्णूला आहे प्रिय, महादेवाला शंखाने पाणी न वाहण्यामागे हे आहे कारण

शिवपुराणातील एका कथेनुसार, शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता. दैत्यराज दंभ याचा तो पुत्र. दैत्यराज दंभाने पुत्रप्राप्ती होण्यासाठी श्रीविष्णूंचे कठोर तप केले.

या विशेष शंखाचे जल भगवान विष्णूला आहे प्रिय, महादेवाला शंखाने पाणी न वाहण्यामागे हे आहे कारण
शंखImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 1:18 PM

मुंबई : समुद्र मंथनावेळी निघालेल्या 14 रत्नांपैकी एक शंखही आहे. सनातन परंपरेत होणाऱ्या पूजेत शंखाचं (shankha Puja) अत्याधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात जवळपास सर्व देवी-देवतांना आपल्या हातात शंख धारण केला आहे. शंखाला जैन, बौद्ध, शैव, वैष्णव इत्यादी परंपरांमध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूला तर हे तो अत्यंत प्रिय आहे. याच कारणामुळे जिथेही भगवान श्री नारायणाची पूजा होते तिथे शंखनाद केला जातो.

अशी आहे पौराणीक कथा

शिवपुराणातील एका कथेनुसार, शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता. दैत्यराज दंभ याचा तो पुत्र. दैत्यराज दंभाने पुत्रप्राप्ती होण्यासाठी श्रीविष्णूंचे कठोर तप केले. दंभाने त्रिलोकात अजेय पुत्रप्राप्ती होण्याचे वरदान मागितले. तथास्तू म्हणून श्रीविष्णू अंतर्धान पावले. यानंतर दंभाला पुत्रप्राप्ती होऊन त्याने त्याचे नाव शंखचूड ठेवले. काही कालावधीनंतर शंखचूडाने पुष्कर येथे कठोर तप करून ब्रह्माजीना प्रसन्न करून घेतले. देवतांवर विजय मिळवण्याचे वरदान ब्रह्माजींनी दिले. तसेच एक श्रीकृष्णकवचही प्रदान केले.

तपश्चर्येने प्रसन्न झाल्यानंतर धर्मध्वज कन्या तुलसी हिच्याशी विवाह करण्याची आज्ञा ब्रह्मदेवांनी शंखचूडाला दिली. ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार तुलसी आणि शंखचूड यांचा विवाह झाला. ब्रह्माजींकडून वरदान मिळालेल्या शंखचूडाने त्रिलोकावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. मात्र, यानंतर तो महालोभी, अहंकारी बनला. त्याने त्रिलोकात त्राहिमाम करण्यास सुरुवात केली. देवतांनाही सळो की पळो करून सोडले.

हे सुद्धा वाचा

श्रीविष्णू आणि ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे कोणत्याच देवतेच्या शक्तीचा, युक्तीचा त्यावर परिणाम होईना. शेवटी त्रस्त देवगण श्रीहरिंकडे आले. मात्र, स्वतःच वरदान दिल्यामुळे श्रीविष्णूही काही करू शकत नव्हते. सर्व देवतांना श्रीविष्णूंनी महादेव शिवशंकरांकडे जाण्याचा सल्ला दिला. शिवनाथाने देवतांची समस्या सोडवण्याचा निश्चय केला. श्रीकृष्णांचे कवच आणि तुलसीचे पावित्र्य यांमुळे अनेकदा आक्रमण करूनही महादेव शंखचूडाचा वध करू शकले नाहीत.

काही केल्या शंखचूडाचा वध होत नाही आणि त्याचे अत्याचारही थांबत नाही म्हटल्यावर श्रीविष्णूंनी स्वतः पुढाकार घेतला. श्रीविष्णूंनी एका तपस्वाचा वेष धारण करत दैत्यराजाकडून श्रीविष्णूकवच दान स्वरुपात मागून घेतले. दुसरीकडे एक लीला करून तुलसीचे पावित्र्यहनन केले.

या दोन्ही गोष्टी झाल्यावर महादेव शिवशंकरांनी तात्काळ त्रिशूलाचा वार करत शंखचूडाचा वध केला. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची निर्मिती झाली असल्याचा दावा केला जातो. शंखचूड हा श्रीविष्णूंचा भक्त होता. या कारणामुळे त्यामुळे शंखातून केलेला जलाभिषेक लक्ष्मी देवी आणि श्रीहरिंना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. मात्र, अहंकारातून केलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखाचूडाचा वध केला. या कारणामुळे शिवपूजनात शंखातून जलार्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज मानला जातो, अशी पौराणिक कथा आढळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)