Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती
महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव (Madhardevi) येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी देवी मानली जाते.
मुंबई: महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव (Madhardevi) येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी देवी मानली जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे-साताऱ्या जिल्हा तसेच वाई भोर-खंडाळाच्या शिखरावर देवीचे वास्तव्य आहे. येथे म्हसोबाचे कडक देवस्थान देखील आहे.
कसे आहे मंदिर हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे. हे मंदिर लहान असुन त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मांढरच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे. देवीआईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवण्यात येतो.
का साजरी करतात पौष पौर्णिमा देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला. त्यामुळेच पौष पौर्णिमेला देवीआईची मोठी यात्रा भरते. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्नभूमीवर ही यात्र रद्द करण्यात आली आहे.
काय आहे आख्यायिका या संदर्भात एक आख्यायिका आहे की सत युगात मांढव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांढव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वतीने त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली.लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला.
संदर्भ – Mandhardevi Kalubai Temple – काळूबाई मांढरदेवी देवस्थान
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)