Ram Mandir : रजिस्ट्रेशन केल्याशिवाय अयोध्येत रामाचं दर्शन घेताच येणार नाही, जाणून घ्या बुकिंगपासून संपूर्ण प्रोसेस
अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. 22 जानेवारीला प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 23 जानेवारीपासून सर्वसामन्य भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं होईल. पण तुम्ही थेट दर्शनाला गेलात तर मात्र हिरमोड होण्याची शक्यता आहे.
मुंबई : अयोध्येत प्रभू रामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे. गाभाऱ्यात प्रभू रामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित केली गेली आहे. आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली जाईल आणि मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. प्राणप्रतिष्ठपनेसाठी गेल्या काही दिवसांपासून विधीवत पूजा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकल्प सोडला असून त्यांच्या उपस्थितीत प्रभू रामाचं दर्शन होणार आहे. 22 जानेवारीनंतर भक्तांना खरी ओढ लागणार आहे ती दर्शनाची..यासाठी भाविकांनी आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे. पण तुम्हालाही दर्शनाला जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तिथे गेल्यावर तुमच्या पदरी निराशा पडायला नको. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय दर्शनाला गेलं तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे दर्शनाची वेळ, आरती, श्रृंगाराबाबत जाणून घ्या. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजून घ्या.
रामाच्या दर्शनासाठी असं कराल ऑनलाईन बुकिंग
- सर्वात आधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाईटवर (https://online.srjbtkshetra.org) वर जा. मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा,
- तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकताच पेज ओपन होईल.
- पेजवर गेल्यावर ‘Darshan’ पर्यायावर क्लिक करा. एक पेज समोर येईल.
- यात दर्शन घ्यायची तारीख, वेळ, भक्तांची संख्या, देश, राज्य आणि मोबाईल नंबर टाकून फोटो अपलोड करावा लागेल.
- या पद्धतीने दर्शनासाठी आपलं बुकिंग होईल
- याच पद्धतीने आरतीसाठी वेगळी बुकिंग करावी लागेल.
बुकिंग केलं नाही तर काय असेल पर्याय
प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केलं नाही तर मंदिराजवळील काउंटरवर सरकार मान्यताप्राप्त ओळखत्र दाखवून तिकिट घेऊ शकता.
राम मंदिरात प्रवेश करण्यापासून दर्शन घेण्यापर्यंत काही नियमांचं पालन करावं लागेल
- महिला आणि पुरुषांना पारंपरिक ड्रेस अनिवार्य आहे.
- पुरुषांसाठी धोती-कुर्ता किंवा पायजमा असेल. महिसांसाठी पंजाबी ड्रेस दुपट्ट्यासह किंवा चूडीदार सूट दुपट्ट्यासह यावं लागेल.
- दहा वर्षाखालील मुलांना तिकीट घेण्याची गरज नाही.
- दर्शनासाठी जाताना ओळखपत्र जवळ असणं अनिवार्य आहे.
- एका तिकीटावर एकच भाविक मंदिरात प्रवेश करू शकतो.
- जर एखाद्या भाविकाने स्लॉट रद्द केला तर ती जागा इतर भाविकांना मिळेल.
- दर्शनासाठी 24 तासात अधिकृत वेबसाईटवर रिमाइंडर मेसेज किंवा मेल येईल.
- भाविक 24 तासांपूर्वी तिकिट रद्द करू शकतात.
अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन सकाळी 6 ते सकाळी 11.30 पर्यंत असेल. त्यानंतर दुपारी 2 नंतर रात्री 7 वाजेपर्यंत दर्शन करता येईल. प्रभू रामांची पाच वेळा आरती होईल. पण भाविकांना तीन आरती घेता येतील. यात पहिली श्रृंगार आरती 6.30, त्यानंतर मध्यान्ह आरती दुपारी 12 वाजता आणि संध्याआरती 7.30 वाजता असेल.