वेस्ट इंडीजचा भारदस्त खेळाडू; भारताविरुद्धच्या सामन्यात 140 किलोचा खेळाडू मैदानात
सर्वात वजनाचा क्रिकेटर कोण असं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर अनेक चेहरे येतील. त्यापैकी नेमकं कुणाचं वजन सर्वाधिक आहे हे कदाचित लक्षात येणार नाही. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज संघात 140 किलो वजनाच्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
पोर्ट ऑफ स्पेन: सर्वात वजनाचा क्रिकेटर कोण असं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर अनेक चेहरे येतील. त्यापैकी नेमकं कुणाचं वजन सर्वाधिक आहे हे कदाचित लक्षात येणार नाही. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज संघात 140 किलो वजनाच्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. रहकीम कॉर्नवॉल असं या खेळाडूचं नाव आहे. कॉर्नवॉल ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. कॉर्नवॉलच्या वेस्ट इंडिज संघातील समावेशाने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक वजनाचा खेळाडू ठरला आहे.
26 वर्षीय कॉर्नवेल 6 फूट 6 इंचाचा आहे. त्याने 55 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 260 विकेट घेतल्या असून 2 हजार 224 धावा केल्या आहेत. कॉर्नवॉलने 2017 मध्ये वेस्ट इंडीज बोर्ड प्रेसिडन्ट इलेव्हन संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात 61 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर कॉर्नवॉलला लवकरच वेस्ट इंडिजच्या संघात संधी मिळेल असं बोललं जात होतं.
कॉर्नवॉलने जुलै 2016 मध्ये भारताविरुद्ध 3 दिवसीय टूर मॅचमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी वेस्टइंडीज बोर्ड प्रेसिडन्ट इलेव्हनकडून खेळताना त्याने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासह 5 खेळाडूंना बाद केले होते. कॉर्नवॉलने 2014 मध्ये लिवार्ड आईसलँडसोबत खेळत प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती. त्याच्या वजनावरुन काहीवेळा चिंताजनक स्थितीही तयार झाली होती. मागील काही वर्षात त्यांचे वजन नियंत्रित करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आहे. विंडीजच्या तत्कालीन निवड समितीचे अध्यक्ष कार्टनी ब्राउन यांनी कॉर्नवॉलसाठी एक विशेष कार्यक्रम देखील घेतला होता. अखेर तो आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळवू शकला आहे.
वेस्टइंडीज क्रिकेट निवड समितीचे प्रमुख रॉर्बट हेंस म्हणाले, “कॉर्नवॉल मागील मोठ्या काळापासून चांगली कामगिरी करत आहे. तो सामना जिंकणारा खेळाडू म्हणून पुढे आला आहे. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.” हेंस म्हणाले, “कॉर्नवॉलच्या गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीला अधिक आक्रमक स्वरुप येईल. त्याच्यामुळे आमच्या फलंदाजांनाही मदत होईल. तो इंडिज संघाच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका निभावेल अशी आम्हाला आशा आहे.” भारत आणि वेस्टइंडीज संघात पहिला कसोटी सामना 22 ऑगस्टला सुरु होईल. तर दुसरा सामना 30 ऑगस्टला खेळला जाईल.
127 किलोच्या लेवरॉकनंतर 12 वर्षांनी 140 किलोच्या कॉर्नवॉलची एंट्री
याआधी बरमूडाचा ड्वेन लेवरॉक हा आपल्या वजनासाठी चर्चेत आला होता. त्याचं वजन 127 किलो होतं. तो भारतासाठी देखील ओळखीचा चेहरा आहे. 2007 च्या विश्वचषकात याच वजनदार लेवरॉकने रॉबिन उथप्पाचा एक अप्रतिम झेल घेतला होता. आता कॉर्नवॉलच्या एंट्रीने सर्वाधिक वजन असलेल्या खेळाडूची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.