बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या रेसमध्ये अजित आगरकर सर्वात पुढे
मुंबईकर अजित आगरकर बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदाचा मुख्य दावेदार आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) निवड समितीत तीन पदे रिक्त आहेत. बीसीसीआय लवकरच ही रिक्त पदे भरणार आहे. त्यासाठी अनेक मोठ-मोठ्या खेळाडूंनी अर्ज केले आहेत. टीम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar), चेतन शर्मा (Chetan Sharma), मनिंदर सिंह आणि शिव सुंदर दास, बंगालचे माजी जलदगती गोलंदाज राणादेव बोस यांसारख्या माजी क्रिकेटर्सनी अर्ज दाखल केले आहेत. रिक्त पदं तीन आणि अर्ज पाच आल्यामुळे या पाचपैकी तिघांची निवड करणं बीसीसीआयसमोर आव्हार असणार आहे. दरम्यान मुंबईकर अजित आगरकरची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा सध्या सुरु आहे. (Ajit Agarkar frontrunner for chief selector of Indian Team selection committee)
अजित आगरकरडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा तगडा अनुभव आहे. आगरकरने 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये त्याने 349 विकेट मिळवल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने 42 सामन्यांमध्ये 29 बळी मिळवले आहेत. आगरकरच्या तुलनेत इतर अर्जदारांचा अनुभव कमी आहे. त्यामुळे आगरकर निवड समितीच्या प्रमुखपदाचा मुख्य दावेदार आहे.
बीसीसीआयच्या संविधानात म्हटलं आहे की, निवड समिती सदस्यांपैकी किंवा त्यासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी ज्या खेळाडूकडे सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असेल, त्यालाच निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते. त्यामुळे बीसीसीआयने जर मनिंदर सिंह किंवा आगरकर या दोघांपैकी एकाची निवड केली तर तो माजी खेळाडू निवड समितीचा नवा अध्यक्ष होईल.
माजी फिरकीपटू मनिंदर सिंह अर्जदारांमध्ये सर्वात वरिष्ठ आहेत. तसेच त्यांच्याकडे 35 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळल्याचा अनुभव आहे. तर अजित आगरकर यापूर्वी मुंबई संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 26 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर विद्यमान अध्यक्ष सुनील जोशी यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आगरकर किंवा मनिंदर या दोघांपैकी कोणाचीही निवड झाली तर तो खेळाडू निवड समितीचा अध्यक्ष होईल.
केवळ तीनच सदस्यपदं रिक्त असताना पाच मोठ्या माजी खेळाडूंनी अर्ज दाखल केल्याने या पाचपैकी कोणाची निवड करायची, असा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर उभा ठाकला आहे. आगरकर आणि चेतन शर्मा जलदगती गोलंदाज होते. मनिंदर सिंह फिरकीपटू तर शिव सुंदर दास हे सलामीचे फलंदाज होते. गोलंदाज राणादेव बोस आणि चेतन शर्मा या दोघांपैकी एकाचीच निवड होऊ शकते, कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोघेही बंगालसाठी खेळायचे.
सदस्यांच्या निवडीबाबत बीसीसीआयची परंपरा आणि संविधान काय म्हणतं?
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमधील सदस्य हे आपापल्या झोनचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ज्या झोनच्या प्रतिनिधीचा कार्यकाळ संपेल त्याच झोनच्या माजी खेळाडूला अथवा तिथल्या व्यक्तीला संधी देण्यात येते. बीसीसीआयच्या याच परंपरेनुसार यावर्षीच्या सुरुवातीला सुनील जोशी आणि हरविंदर सिंह यांची निवड समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. परंतु बीसीसीआयचं नवं संविधान या परंपरेला मानत नाही. त्यात म्हटलं आहे की, जो सर्वोत्तम उमेदवार असेल, त्याचीच निवड व्हायला हवी.
आगरकर आणि मनिंदर यांचा पुन्हा एकदा अर्ज
अजित आगरकर आणि मनिंदर सिंह यांनी मागील वेळीदेखील निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यावेळी दोघांनाही डावलण्यात आलं. त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता की, आगरकर आणि मनिंदर यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची गरज पडणार नाही. दोघांचेही जुने अर्ज कायम राहतील. परंतु दोघांनीही कोणतीही जोखीम न पत्करता पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे.
इतर बातम्या
(Ajit Agarkar frontrunner for chief selector of Indian Team selection committee)