11 वर्षानंतर झाली ऐतिहासिक निवडणुक; अमोल काळे मुंबई क्रिकेटअसोशिएशनचे नवे अध्यक्ष
तब्बल 11 वर्षानंतर राजकारणी व्यक्ती मुंबई क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष बनला आहे.
मुंबई : बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कार्यकारिणीची निकाल जाहीर झाला आहे.या निवडणुकीत राजकारणी विरुद्ध क्रिकेटपटू असा सामना रंगला होता. शरद पवार-आशीष शेलार गटाचे अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे संदीप पाटील यांच्यात लढत झाली. अखेरीस शरद पवार-आशीष शेलार गटाचे अमोल काळे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तब्बल 11 वर्षानंतर राजकारणी व्यक्ती मुंबई क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष बनला आहे. यापूर्वी विलासराव देशमुख विरुद्ध दिलीप वेंगसरकर असा सामना एमसीए निवडणुकीत झाला होता.
अपेक्षा आहे त्यांच्याकडून की मुंबई क्रिकेटचं भवितव्य बघतील. सगळे राजकारणी एकत्र राहिले पाहिजे. मुंबई क्रिकेट महत्त्वाचं आहे. फक्त निवडणुकीकरता एकत्र राहणं महत्त्वाचं नव्हतं असा टोला संदीप पाटील यांनी लगावला.
चांगली टीम एकत्र राहणं महत्त्वाचं, आता निवडणूक झालेली आहे. मुंबईचं भवितव्य महत्वाचं. संघर्ष क्रिकेटच्या मैदानात असतोच, जिंकणं हारणं मी लहानपणापासून पाहत आलो आहे असंही संदीप पाटील म्हणाले.
मुंबई क्रिकेट असोशिएशनचे एकूण 380 मतदार आहेत. त्यापैकी 51 क्रिकेटर्स मतदार आहेत, तर 329 मतदार क्लबचे प्रतिनिधी आहेत. अमोल काळे 183 मतांची आघाडी घेत विजयी झाले आहेत.
निवडणुकीसाठी शेलार-पवार एकत्र आले
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील अशी निवडणूक होणार होती. संदीप पाटील शरद पवार गटाच प्रतिनिधीत्व करणार होते. या निवडणुकीआधी एक बैठक झाली. त्यात आशिष शेलार आणि शरद पवार यांचा गट एकत्र आला.
आशिष शेलार यांची दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात लढत झाली.
MCA निवडणूक सेलिब्रेटी उमेदवार
संदीप पाटील (अध्यक्ष पद : मुंबई क्रिकेट गट)
अमोल काळे (अध्यक्ष पद : पवार-शेलार गट)
अजिंक्य नाईक ( सचिव पद : पवार शेलार गट-मुंबई क्रिकेट गट)
जितेंद्र आव्हाड (सदस्य पद : पवार-शेलार गट)
मिलिंद नार्वेकर (सदस्य पद: पवार-शेलार गट)
राजकीय मतदार
1) संदीप दळवी (मनसे सरचिटणीस आणि आशीष शेलार यांचे मेहुणे) एमिंग मास्टर क्रिकेट क्लब
2) शुभम प्रसाद लाड ( प्रसाद लाड यांचे चिरंजीव) बॅरोनेट क्रिकेट क्लब
3) विहंग सरनाईक (प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव) बोरीवली क्रिकेट क्लब
4) राहुल शेवाळे ( शिवसेना खासदार) दादर क्रिकेट क्लब
5) सचिन अहिर ( शिवसेना आमदार) एम बी युनियन क्रिकेट क्लब
5) जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस आमदार-माजी मंत्री) मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब
6) अमोल काळे ( देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय) मस्कती क्रिकेट क्लब
7) उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेरी क्रिकेट क्लब
8) मिलिंद नार्वेकर ( सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) न्यु हिंदू क्रिकेट क्लब
9) शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) पारसी पायोनियर क्रिकेट क्लब
10) भूषण सुभाष देसाई (सुभाष देसाई यांचे चिरंजीव) प्रबोधन-गोरेगाव
11) आशीष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप ) राजस्थान स्पोर्ट्स क्लब
12) प्रताप सरनाईक (आमदार, बाळासाहेबांची शिवसेना) विजय क्रिकेट क्लब
13) तेजस ठाकरे ( उद्धव ठाकरेंचे चिरंजीव) वेलिंगटन क्रिकेट क्लब
14) आदित्य ठाकरे ( माजी मंत्री- नेता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यंग फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब