मेलबर्न टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या सह-कर्णधारपदी ‘आर्ची’
मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघात होणाऱ्या आगामी मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा एका नवख्या खेळाडूच्या खांद्यावर असणार आहे. अत्यंत गोरा-गोमटा आणि कुणीही त्याच्या प्रेमात पडावं, असा हा खेळाडू आहे. ‘आर्ची शिलर’ असे त्याचे नाव आहे. वय आहे फक्त 7 वर्षे. आहे की नाही, काहीसं विस्मयचकित करणारं? पण यामागेही एक ‘हृदय’द्रावक कहाणी आहे. मेलबर्नमध्ये […]
मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघात होणाऱ्या आगामी मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा एका नवख्या खेळाडूच्या खांद्यावर असणार आहे. अत्यंत गोरा-गोमटा आणि कुणीही त्याच्या प्रेमात पडावं, असा हा खेळाडू आहे. ‘आर्ची शिलर’ असे त्याचे नाव आहे. वय आहे फक्त 7 वर्षे. आहे की नाही, काहीसं विस्मयचकित करणारं? पण यामागेही एक ‘हृदय’द्रावक कहाणी आहे.
मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सुरु होणार आहे. या कसोटीत ‘आर्ची शिलर’ ऑस्ट्रेलियाचा सहकर्णधार असेल. 15 जणांच्या ऑस्ट्रेलियन संघात आर्चीचा समावेश करण्यात आला आहे.
आर्ची शिलरला हृदयाचा आजार आहे. आर्ची तीन महिन्यांचा असताना, त्याला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जन्मानंतर जवळपास आठवडाभर आर्चीवर विविध शस्त्रक्रिया सुरु होत्या. सातत्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही आर्चीवर शस्त्रक्रिया झाली.
एकदिवस आर्चीच्या वडिलांनी त्याला विचारलं की, तुला काय व्हायचं आहे, तो म्हणाला, “मला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार बनायचंय.” मग आर्चीच्या इच्छापूर्तीसाठी वडिलांसह ‘मेक अ विश ऑस्ट्रेलिया फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने प्रयत्न सुरु केले आणि त्यांना यशही मिळाले.
Happy birthday Archie Schiller! The new Aussie squad member recently got a chance to meet his heroes with thanks @MakeAWishAust and he’ll rejoin his teammates on Sunday at the MCG
More about Archie HERE: https://t.co/ctXeVwWwOL #AUSvIND pic.twitter.com/O0C4oDIsyh
— cricket.com.au (@cricketcomau) December 22, 2018
आर्चीचा सातवा वाढदिवस होता, त्याच दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन याने आर्चीला सहकर्णधार बनवण्याची घोषणा केली. या घोषणेमुळेही आर्चीचा वाढदिवस स्मरणीय ठरला आहे. आता प्रतीक्षा आहे ती आर्ची मेलबर्न कोसटीचा सहकर्णधार म्हणून मैदानात उतरेल याची.
“आर्ची अत्यंत कठीण स्थितीतून जात आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील बराचसा काळ हॉस्पिटलमध्ये घालवलाय. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही एवढे तर निश्ति करु शकतो.” असे ऑस्ट्रेलियन टीमचे प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले.
क्रिकेट जेंटलमन गेम म्हणून प्रसिद्ध आहे. या खेळाने अनेकांना भरभरुन आनंद दिला आहे. क्रिकेटरसिकांच्या प्रेमाला देशाच्याही सीमा अडवत नाहीत. आर्चीच्या रुपाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने क्रिकेटविश्वाची ही प्रेमपरंपरा कायम राखली आहे.