IND vs AUS : आधी न्यूझीलंडकडून 3-0 ने लज्जास्पद पराभव, आता टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका
IND vs AUS : पुढच्या आठवड्यात टीम इंडिया महत्त्वाच्या दौऱ्याला निघणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाला एक झटका बसला आहे. टीमसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. आधीच टीम इंडियाचा न्यूझीलंडने 3-0 ने दारुण पराभव केलाय.
भारतीय क्रिकेट टीमच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 असा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. टीम इंडियाचा पुढचा दौरा यापेक्षा खडतर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्याचा फॉर्म लक्षात घेता ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचा निभाव लागणं कठीण दिसतय. टीम इंडियासाठी सर्वकाही आलबेल नसतानाच आता टीमसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. मोहम्मद शमीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची उरली-सुरली अपेक्षाही मावळताना दिसतेय. शमी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आहे. शमी अजूनही पूर्णपणे फिट नाहीय. त्यामुळे तो पुढच्या दोन रणजी सामन्यात खेळणार नाहीय.
टीम इंडिया पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. 22 नोव्हेंबरपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. मागच्या एकवर्षापासून दुखापतीमुळे शमी टीम इंडियाच्या बाहेर आहे. गुडघ्याला सूज आल्याने अडचणी वाढल्या आहेत. 6 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या रणजी सामन्यात शमी खेळेल असं बोललं जात होतं. घरच्या बंगालच्या टीमकडून कमीत कमी दोन सामने खेळून शमी फिटनेस सिद्ध करणार होता. पण आता ही शक्यता मावळली आहे.
दीर्घ वाट पहावी लागणार
बंगाल क्रिकेट संघटनेने पुढच्या दोन रणजी सामन्यांसाठी स्क्वॉडची घोषणा केली आहे. पण यात शमीला जागा मिळालेली नाही. बंगालचा पहिला सामना कर्नाटक विरुद्ध आहे. त्यानंतर 13 नोव्हेंबरला मध्य प्रदेश विरुद्ध सामना आहे. काही दिवसांपूर्वी शमी चिन्नास्वामी स्टेडियमवर बॉलिंद प्रॅक्टिस करताना दिसला होता. शमी आता या दोन्ही सामन्यातून बाहेर गेलाय. शमीच्या पुनरागमनासाठी आता आणखी दीर्घ वाट पहावी लागणार आहे.
पण आता ही शक्यता मावळली
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा मागच्या महिन्यात झाली. यात शमीची निवड झाली नव्हती. अशी अपेक्षा होती की, शमीने हे दोन रणजी सामने खेळून फिटनेस सिद्ध केला, तर त्याला सीरीजच्या उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळे टीम इंडियाची ताकद वाढली असती. पण आता ही शक्यता मावळली आहे.