IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीचा मोठा कारनामा, सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डला धोका
IND vs AUS : विराट कोहली मैदानात उतरला आणि नवीन रेकॉर्ड झाला नाही, असं कसं होईल. काहीशी अशीच कमाल विराट कोहलीने ब्रिसबेन टेस्टमध्ये केलीय. विराटसाठी ऑस्ट्रेलिया असा पहिला संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध त्याने अशी कामगिरी केलीय. पुढे जाऊन तो सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्डही मोडू शकतो.
ब्रिसबेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या टेस्टसाठी मैदानात उतरताच विराट कोहलीने आपलं शतक पूर्ण केलं. विराट कोहलीच हे शतक धावांच नसून त्याने खेळलेल्या सामन्यांच आहे. ब्रिसबेनमध्ये विराट कोहलीच्या या अनोख्या शतकामुळे आता सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डला धोका निर्माण झाला आहे. कुठल्याही एका प्रतिस्पर्धी टीम विरुद्ध सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्धच सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. सचिन ऑस्ट्रेलिया विरुद्ध 110 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
इतकेच सामने खेळण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेच्या नावावर आहे. जयवर्धन भारताविरुद्ध 110 सामने खेळला आहे. एकाच टीम विरुद्ध सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं नाव सचिनचच आहे. तो श्रीलंकेविरुद्ध 109 सामने खेळलाय. त्यानंतर या यादीत सनथ जयसूर्याच नाव येतं. तो पाकिस्तान विरुद्ध 105 आणि भारताविरुद्ध 103 सामने खेळलाय. पाकिस्तान विरुद्धच 103 सामने खेळण्याचा रेकॉर्ड माहेला जयवर्धनेच्या नावावर आहे.
सचिनचा रेकॉर्ड मोडणार की नाही?
आता कदाचित विराट कोहली या सगळ्यांच्या पुढे निघून जाईल अशी शक्यता आहे. क्रिकेट विश्वात कुठल्या एका टीम विरुद्ध सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनू शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 वा सामना खेळणारा विराट कोहली या टीम विरुद्ध आणखी 11 सामने खेळल्यास एकाच टीम विरुद्ध सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर्वात पुढे निघून जाईल. विराट कोहली आता 36 वर्षांचा झालाय. विराटमध्ये आता किती क्रिकेट शिल्लक आहे, त्यावरच तो सचिनचा रेकॉर्ड मोडणार की नाही? हे अवलंबून आहे. T20 क्रिकेटमधून तो आधीच रिटायर झालाय.
विराट कुठल्या टीम विरुद्ध किती सामने खेळलाय?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा विराट त्याखालोखाल इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 85 सामने खेळला आहे. श्रीलंकेविरुद्ध 75, वेस्ट इंडिज विरुद्ध 73, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 61, न्यूझीलंड विरुद्ध 55, बांग्लादेश विरुद्ध 30 आणि पाकिस्तान विरुद्ध 27 सामने खेळलाय.