CWG 2022 दरम्यान भारतीय एथलीटवर 3 वर्षांची बंदी, पीटी उषाचा मोडला होता रेकॉर्ड
भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कमालीची कामगिरी करत असतानाच, एक झटका लागला आहे. भारताची एथलीट धनलक्ष्मी सेकरला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
मुंबई: भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कमालीची कामगिरी करत असतानाच, एक झटका लागला आहे. भारताची एथलीट धनलक्ष्मी सेकरला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. डोप टेस्ट मध्ये फेल झाल्यानंतर तिला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. वाडा 2022 यादीतील प्रतिबंधित मेटांडियनोन टेस्ट मध्ये ती पॉझिटिव्ह आढळली. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये धनलक्ष्मीकडून संपूर्ण देशाला अपेक्षा होती. पण गेम्स सुरु होण्याआधीच ती डोपिंग मध्ये फसली. यामुळे भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. ती बाहेर गेल्यामुळे संघही कमकुवत झालाय. धनलक्ष्मी 4×100 मीटर रिले टीमची सदस्य होती.
व्हिसा समस्येमुळे ती संघासोबत गेली नाही
धनलक्ष्मीने वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी क्वालिफाय केलं होतं. पण ती अन्य खेळाडूंसोबत गेली नव्हती. त्यावेळी काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावेळी व्हिसा समस्येमुळे ती संघासोबत गेली नाही. मागच्यावर्षी फेडरेशन कप मध्ये पीटी उषाचा 23 वर्ष जुना रेकॉर्ड तिने मोडला होता. धनलक्ष्मीचं वर्ल्ड एथलॅटिक्स एथलीट इंटीग्रिटी यूनिटने देशाबाहेर नमुना घेतला होता. त्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळला.