CWG 2022: हॉकीत सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाकडून अत्यंत दारुण पराभव
12 वर्षापूर्वी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स (CWG) मध्ये जे झालं होतं, आज बर्मिंघम मध्ये पुन्हा तेच दृश्य पहायला मिळालं. निकाल बदलला नाही, ना परिस्थिती.
मुंबई: 12 वर्षापूर्वी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स (CWG) मध्ये जे झालं होतं, आज बर्मिंघम मध्ये पुन्हा तेच दृश्य पहायला मिळालं. निकाल बदलला नाही, ना परिस्थिती. भारतीय पुरुष हॉकी (Indian mens Hockey Team) संघाला CWG फायनलमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. फक्त रौप्यपदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. भारतीय हॉकी संघ जबरदस्त कामगिरीच्या बळावर फायनल मध्ये पोहोचला होता. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताचा अत्यंत दारुण असा 7-0 ने पराभव केला. कॉमनवेल्थ मध्ये सलग सातव्यांदा ऑस्ट्रेलियन हॉकी संघाने गोल्ड मेडल मिळवलं.
सामन्याआधी झटका
या मॅच आधी भारतीय संघाला एक झटका बसला. टीमचा मुख्य खेळाडू फायनल आधी बाहेर गेला. भारतीय टीमचा स्टार खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळला नाही. या महत्त्वाच्या सामन्याआधी त्याला दुखापत झाली होती. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
#CommonwealthGames2022 | India wins Silver in Men’s Hockey finals with Australia pic.twitter.com/6u16UAwxoY
— ANI (@ANI) August 8, 2022
इतिहास रचण्याची संधी होती
भारतीय हॉकी टीमकडे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये इतिहास रचण्याची संधी होती. भारतीय हॉकी संघ कधीच कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल जिंकू शकलेला नाही. हॉकी संघाला फक्त दोन रौप्यपदक मिळवता आली आहेत. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता. भारतीय पुरुष हॉकी संघ 2010 आणि 2014 मध्ये कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचला होता. दोन्हीवेळा ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभूत केलं.