IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला आज संघात 3 बदल करावे लागतील, अन्यथा….
IND vs SL: भारतीय टीमला रविवारी आशिया कप 2022 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हा सामना झाला. पाकिस्तानने भारताचा पाच विकेट राखून पराभव केला.
मुंबई: भारतीय टीमला रविवारी आशिया कप 2022 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हा सामना झाला. पाकिस्तानने भारताचा पाच विकेट राखून पराभव केला. सुपर 4 राऊंड मधला हा सामना खूपच रोमांचक ठरला. शेवटच्या षटकात सामन्याचा निकाल लागला. या पराभवामुळे भारताला फायनल मध्ये पोहोचण्याचा मार्ग थोडा कठीण बनलाय. मंगळवारी भारत श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना गमावला, तर फायनल पर्यंतचा प्रवास खूपच कठीण होऊन बसेल.
श्रीलंकेच्या संघात जास्त आत्मविश्वास, कारण….
टीम इंडियाने पाकिस्तान विरोधात खेळताना काही चुका केल्या. आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला त्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. टीम इंडियाला आपल्या रणनिती मध्ये बदल करावा लागेल. तरच श्रीलंकेवर विजय मिळवता येईल. श्रीलंकेचा संघ या मॅच मध्ये आत्मविश्वासाने उतरेल. कारण त्यांनी सलग दोन विजय मिळवले आहेत. बांगलादेशला हरवून त्यांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर अफगाणिस्तानला पराभूत केलं. त्यामुळे भारताविरोधात ही टीम पूर्ण आत्मविश्वासाने मैदाना उतरेल.
टीम इंडियाला तीन मोठे बदल करावे लागतील
- टीम इंडियाचे हेड कोच आणि कॅप्टनने अनेकदा आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर देणार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान विरोधात याच रणनितीने भारताला अडचणीत आणलं होतं. टीम इंडियाने सातत्याने विकेट गमावले. त्यामुळे सुरुवातीला जो वेग होता, त्यानुसार अपेक्षित धावसंख्येपर्यंत टीम पोहोचू शकली नाही. या रणनिती मध्ये भारताला बदल करण्याची गरज आहे. टीम इंडिया स्थितीनुसार खेळावं लागेल.
- टीम कॉम्बिनेशन बद्दल विचार करावा लागेल. टीम इंडियाने पाकिस्तान विरोधात दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवले होते. हार्दिक पंड्याच्या रुपात ऑलराऊंडर होता. श्रीलंकेविरोधात भारताला तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरावं लागेल. पंड्या असेल, तर भारताकडे चौथ्या वेगवान गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध होईल.
- भारताला प्लेइंग-11 मध्ये दोन ऑलराऊंडर्सचा समावेश करावा लागेल. पंड्याशिवाय अक्षर पटेलला टीम मध्ये स्थान दिलं पाहिजे. फलंदाजी बरोबर स्पिनचाही पर्याय त्यामुळे उपलब्ध होतो. पाकिस्तान विरुद्ध भारताने दीपक हुड्डाला संधी दिली होती. हुड्डा बॅटिंग करतो. त्याशिवाय चेंडूने देखील योगदान देऊ शकतो. पण रोहितने हुड्डाला गोलंदाजी दिली नाही.