‘Umran Malik अजून कच्चा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार नाही’, प्रसिद्ध क्रिकेटपटूचं परखड विश्लेषण
सध्याच्या घडीला उमरान मलिक (Umran Malik) हा भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. 155, 157 किमी प्रतितास वेगाने तो गोलंदाजी करु शकतो. सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या या खेळाडूने आयपीएल 2022 मधील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
मुंबई: सध्याच्या घडीला उमरान मलिक (Umran Malik) हा भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. 155, 157 किमी प्रतितास वेगाने तो गोलंदाजी करु शकतो. सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या या खेळाडूने आयपीएल 2022 मधील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. उमरानची आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजसाठी (South Africa Series) संघात निवड झाली. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टी 20 संघात त्याची निवड झाली. आयर्लंड विरुद्धच्या सीरीज मध्ये त्याने डेब्यु केला. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध सुद्धा त्याला संधी मिळाली. तो आतपर्यंत टी 20 चे तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याच्या नावाची चर्चा बरीच आहे. पण त्या तुलनेत, त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. 150 KPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरानला भारतीय संघातील आपलं स्थान भक्कम करण्यासाठी दमदार प्रदर्शन करावं लागेल. उमरान मलिक अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी परफेक्ट नाहीय, असंही काही क्रिकेट तज्ज्ञांच मत आहे.
जे दुसऱ्यांमध्ये नाही, ते उमरान मलिक मध्ये आहे
जम्मू-काश्मीर मधून येणाऱ्या उमरान मलिकला अजून बरच शिकायच असून स्वत:ला सिद्ध करावं लागेल. प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांचं सुद्धा उमरान मलिकबद्दल हेच मत आहे. “दुसऱ्यांमध्ये जी गोष्ट नाही, ती उमरान मलिक मध्ये आहे. त्याच्या गोलंदाजीत एक नैसर्गिक वेग आहे. हे तुम्ही दुसऱ्या कोणाला शिकवू शकत नाही. दिशा, टप्पा, यॉर्कर, बाऊन्सर, स्लोअरवन हे तुम्ही सगळं शिकवू शकता. पण वेगाने गोलंदाजी करणं नाही शिकवू शकतं. तुम्ही एक वेगवान किंवा मध्यमगती गोलंदाज म्हणून जन्माला येता” असं आकाश चोप्रा त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला.
उमरान मलिक अजून कच्चा
“उमरान मलिककडे वेग आहे, यात कुठलीही शंका नाही. पण तो अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार नाहीय, असं मला वाटतं. त्याला अजून वेळ हवा आहे. तो कच्चा आहे. उमरान अजून जास्त क्रिकेट खेळलेला नाही” असं आकाश चोप्रा यांचं मत आहे. उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या.